श्रीपतराव शिंदेंच्या संघर्षाचा वारसा नेटाने पुढे चालवणार, जनता दल कार्यकर्त्यांचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 05:36 PM2023-10-21T17:36:27+5:302023-10-21T17:37:01+5:30
गडहिंग्लज: जेष्ठ समाजवादी नेते अॅड.श्रीपतराव शिंदे यांच्या विविध चळवळी आणि संघर्षाचा वारसा नेटाने पुढे चालवण्याचा निर्धार जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी ...
गडहिंग्लज: जेष्ठ समाजवादी नेते अॅड.श्रीपतराव शिंदे यांच्या विविध चळवळी आणि संघर्षाचा वारसा नेटाने पुढे चालवण्याचा निर्धार जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत केला.त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी बुधवारी (२५) गडहिंग्लज प्रांतकचेरीवर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली.
अॅड. शिंदे यांचे आठवड्यापूर्वी निधन झाले. त्यानिमित्त येथील पक्ष कार्यालयात 'प्रेरणा सभा' झाली. अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब मोरे होते. यावेळी जेष्ठ कार्यकर्त्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. शंकर रणदिवे म्हणाले, शिंदेनी आचरणातूनच निष्ठेची शिकवण दिली. काशिनाथ देवगोंडा म्हणाले, येणारा काळ संकटचा आहे,त्याला एकदिलाने सामोरे जाण्याची गरज आहे. सुनील शिंदे म्हणाले, मुंबईतील पक्ष कार्यालय वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या आजाराकडेही दुर्लक्ष केले. शैलेश पाटील म्हणाले, गडहिंग्लज नगरपालिकेवरील सत्ता अबाधित राखणे,हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. याप्रसंगी हिंदुराव नौकुडकर, बापूसाहेब म्हेत्री,दत्ता मगदूम,महेश कोरी यांच्यासह मोरे यांचेही भाषण झाले.
यावेळी अकबर मुल्ला, प्रकाश मंत्री, राम मजगी, बसवराज खणगावे, निंगाप्पा भमानगोळ, सुभाष निकम, भीमराव पाटील, मलगोंडा पाटील, बाबासाहेब पाटील, रामगोंडा पाटील, आनंदा सावंत, अजित शिंदे, शशिकांत चोथे, नरेंद्र भद्रापूर, नितीन देसाई आदींसह शहर व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.