नूलमध्ये जनता दल-राष्ट्रवादी यावेळीही एकत्रच..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:32 PM2020-12-17T16:32:45+5:302020-12-17T16:34:14+5:30
gram panchayat, Elecation, Kolhapurnews नूल (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी जनता दल व राष्ट्रवादी यावेळीदेखील एकत्रच लढण्याची शक्यता आहे. त्यांच्याबद्दल नाराजी असणाऱ्या मंडळींच्या साथीने आव्हान देण्याच्या हालचाली भाजपाकडून सुरू आहेत.
राम मगदूम
गडहिंग्लज- नूल (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी जनता दल व राष्ट्रवादी यावेळीदेखील एकत्रच लढण्याची शक्यता आहे. त्यांच्याबद्दल नाराजी असणाऱ्या मंडळींच्या साथीने आव्हान देण्याच्या हालचाली भाजपाकडून सुरू आहेत.
माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या या गावात अनेक वर्षे एकमेकांच्या विरोधात लढलेले जनता दल-राष्ट्रवादी गेल्यावेळी पहिल्यांदाच एकत्र लढले. त्यांना भाजपा-शिवसेना युतीने आव्हान दिले. परंतु, आघाडीने एकतर्फी बाजी मारली. १५ पैकी ९ जागा जनता दलाला तर ६ जागा राष्ट्रवादीला मिळाल्या.
निवडणुकीपूर्वी सरपंचपद जनता दलाकडे तर उपसरपंचपद राष्ट्रवादीकडे असे सूत्र ठरले होते. त्यानुसार जदचे बाजीराव चव्हाण-पाटील व स्वाती प्रविण शिंदे यांना सरपंचपदी तर राष्ट्रवादीच्या कल्लाप्पाण्णा देसाई यांना उपसरपंचपदी संधी मिळाली.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत जनता दल व राष्ट्रवादीने राजेश पाटील यांना पाठबळ दिले. परंतु, विरोधी आघाडीतील भाजपाचे मल्हार शिंदे, कुमार देसाई व महादेव वडर, शिवसेनेचे डॉ. दिलीप मांजरेकर व डॉ. स्वप्निल चव्हाण, वंचितचे भीमा नंदनवाडे यांनी सोयीची भूमिका घेतली. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवरच निवडणुकीचे चित्र व रंगत अवलंबून आहे.
विरोधकांची मदार नाराजांवर
जि. प. निवडणुकीतील पराभवामुळे राष्ट्रवादीचे जितेंद्र शिंदे नाराज आहेत. आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत नूलमध्ये झालेल्या स्वतंत्र बैठकीत त्यांनी जनता दलाबरोबर आघाडी नको असे मत मांडल्याचे समजते.जदचे प्रमुख कार्यकर्ते पापा चौगुले हेही अलिकडे पक्षापासून लांब आहेत. यांच्यावरच विरोधकांची मदार राहणार आहे.
जयसिंग, पी.एम., आले एकत्र
शिवपार्वती दूध संस्थेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते जयसिंग चव्हाण आणि पी. एम. चव्हाण, इकबाल काझी हे पुन्हा एकत्र आले आहेत. वैयक्तिक मतभेद असले तरी हे तिघेही नेहमी पक्षाबरोबरच राहिले आहेत.
- एकूण मतदार - ६४००
- एकूण प्रभाग - ५
- एकूण सदस्य - १५