जनता दल (से) महाराष्ट्रात समविचारींसोबत; पुण्यातील बैठकीत निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2023 07:45 PM2023-10-01T19:45:01+5:302023-10-01T19:46:38+5:30

देवेगौडांच्या भाजपा युतीला ठाम विरोध

janata dal secular with like minded people in maharashtra decision at the meeting in pune | जनता दल (से) महाराष्ट्रात समविचारींसोबत; पुण्यातील बैठकीत निर्धार

जनता दल (से) महाराष्ट्रात समविचारींसोबत; पुण्यातील बैठकीत निर्धार

googlenewsNext

राम मगदूम, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर: जनता दलाने (सेक्युलर) महाराष्ट्रात समविचारींबरोबरच माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी भाजपाबरोबर केलेल्या युतीलाही ठाम विरोध करण्याचा निर्धार प्रदेश जनता दलाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत एकमुखाने केला आहे.  

राष्ट्र सेवा दलाच्या पुणे येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित राज्यस्तरीय व्यापक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी आमदार गंगाधर पटणे होते. बैठकीस राज्यातील २० जिल्ह्यातील ८० निमंत्रित सदस्य उपस्थित होते. प्रारंभी डॉ. स्वामिनाथन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
राष्ट्रीय पातळीवर भाजपप्रणित आघाडीच्या विरोधी भूमिकेतून जनता दलाच्या विविध राज्य संघटनांनी सामूहिक विचार प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामध्येही सक्रीय सहभागी होण्याचा निर्णय यावेळी झाला.

राज्यातील अन्य समविचारी पक्षांपैकी योग्य पर्याय निश्चित करण्यासाठी समान विचारसरणी असलेले राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष व अन्य पयार्यासंदर्भात समक्ष चर्चेसाठी खास समिती नेमण्यात आली. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्या संमतीने ही समिती संबंधित पक्ष नेतृत्वाशी चर्चा करेल. त्यानंतर त्यामध्ये सहभागी होण्याचा व पुढील वाटचाल करण्याचा निर्णयही यावेळी झाला.

बैठकीस साजिदा निहाल अहमद, प्रताप होगाडे, शिवाजी परुळेकर, अ‍ॅड. रेवण भोसले, डॉ. विलास सुरकर, सलीम भाटी, अ‍ॅड. नंदेश अंबाडकर, विठ्ठल सातव, दत्तात्रय पाकिरे, विद्याधर ठाकूर, प्रभाकर नारकर, शानेहिंद निहाल अहमद, साधना शिंदे, कर्नल चंद्रशेखर रानडे, नाना मानकर, जितेंद्र सत्पाळकर, शरद पाडळकर, जीवन श्रीसुंदर, विनायक लांबे, अशोक गायकवाड आदी उपस्थित होते. विठ्ठल सातव यांनी स्वागत केले. डॉ. पी. डी. जोशी-पाटोदेकर यांनी सूत्रसंचलन केले. युयुत्सु आर्ते यांनी आभार मानले.

देवेगौडांशी संबंध तोडले

देवेगौडांच्या युतीचे परिणाम सर्व राज्यांतील कार्यकर्ते व मतदारांवर होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनाही राष्ट्रीय नेतृत्व व पक्षाशी संबंध तोडणे अपरिहार्य आहे. त्यामुळे अन्य समविचारी पक्षांसोबत राहण्याचा निर्णय बैठकीत झाला.  
 

Web Title: janata dal secular with like minded people in maharashtra decision at the meeting in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.