निमशिरगावमध्ये संविधानाचा जागर : घटनेवर स्वाक्षरी असलेल्या रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे जन्मगाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 11:23 PM2018-10-19T23:23:12+5:302018-10-19T23:28:35+5:30
राष्ट्रीय एकात्मता जोपासत शांततेच्या मार्गाने विकासपथावर नेणारे संविधान हा देशाचा भक्कम आधार आहे. यामुळे देशातील नागरिकांना माणूस म्हणून जगण्याचे हक्क प्राप्त झाले. अशा महत्त्वपूर्ण संविधानावर स्वाक्षरी करण्याचा सन्मान देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांना लाभला.
घन:शाम कुंभार ।
यड्राव : राष्ट्रीय एकात्मता जोपासत शांततेच्या मार्गाने विकासपथावर नेणारे संविधान हा देशाचा भक्कम आधार आहे. यामुळे देशातील नागरिकांना माणूस म्हणून जगण्याचे हक्क प्राप्त झाले. अशा महत्त्वपूर्ण संविधानावर स्वाक्षरी करण्याचा सन्मान देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांना लाभला. त्यांचे जन्मगाव निमशिरगाव (ता. शिरोळ) येथे संविधान जागृतीचा उपक्रम चार टप्प्यांत राबविण्यात येणार आहे, असा उपक्रम राबविणारे हे देशातील पहिले गाव ठरणार आहे.
पहिल्या टप्प्यात गावातील प्रत्येक घर, शाळा व संस्थांमध्ये संविधानाची प्रत व संविधान प्रास्ताविकाचे पोस्टर लावणे, याचबरोबर संविधानासंबंधी माहिती असणाऱ्या पुस्तकांचे वाटप करणे, गावातील प्रमुख ठिकाणी नागरिकांचे हक्क, कर्तव्ये व पंचायतराज संबंधी माहितीचे फलक लावणे. तर दुसºया टप्प्यात स्वातंत्र्य चळवळीपासून संविधान विकासक्रम, संविधान सभेचे कामकाज, महात्मा गांधी, डॉ. राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रत्नाप्पाण्णा कुंभार, आदी नेत्यांचे संविधानसभांचे फोटो व माहितीचे प्रदर्शन भरविणे, तिसºया टप्प्यात वर्षभरात संविधान जागराचे चार कार्यक्रम करणे. चौथ्या टप्प्यात गाव विकासासाठी सुचविलेल्या विकासकामांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करून प्रत्यक्ष श्रमदानातून ग्रामविकास एकसंघपणे करत राहणे.
निमशिरगाव हे रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे जन्मगाव आहे. रत्नाप्पाण्णांची स्वाक्षरी भारताच्या घटनेवर आहे. याचा सार्थ अभिमान गावाला आहे. संविधानाची माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहोचावी, यासाठी जी संकल्पना अंनिसचे कार्याध्यक्ष सुनील स्वामी यांनी मांडली. त्यानुसार गावातील प्रत्येक घरांच्या दरवाजावर संविधानाची प्रस्तावना लावून येणाºयांचे स्वागत करून संविधानाचे महत्त्व वाढविण्यात येणार आहे.
- प्रा. शांताराम कांबळे, निमशिरगाव