मोर्चासाठी रणरागिणींचा रॅलीने जागर
By admin | Published: October 14, 2016 12:31 AM2016-10-14T00:31:33+5:302016-10-14T01:21:11+5:30
मराठा मोर्चाला यायचंय : हजारो दुचाकींसह सहभाग; शहराचे लक्ष वेधले; पथनाट्यातून मांडली आरक्षणाची भूमिका
कोल्हापूर : महाविद्यालयीन तरुणींपासून सर्व वयोगटांतील महिलांचा सहभाग असलेल्या शिस्तबद्ध मोटारसायकल रॅलीने कोल्हापूरवासीयांचे लक्ष वेधले. निमित्त होते मराठा मूक मोर्चाच्या जनजागृतीचे. सकल मराठा महिलांच्यावतीने गुरुवारी सकाळी ताराराणी चौक येथून शहराच्या प्रमुख मार्गांवरून दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतून हजारो महिला, तरुणी सहभागी झाल्या होत्या. उद्या, शुक्रवारी कोल्हापुरातून निघणाऱ्या मोर्चात सर्व जातिधर्माच्या महिलांनी सहभागी व्हावे याकरिता शहराच्या प्रमुख मार्गांवरून रॅली काढण्यात आली. त्याची सुरुवात सकाळी ताराराणी चौक येथून झाली. यावेळी महापौर अश्विनी रामाणे यांच्या हस्ते छत्रपती ताराराणी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
या रॅलीचा मार्ग दाभोळकर कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, दसरा चौक, आईसाहेब महाराज चौक, बिंदू चौक, शिवाजी चौक, भाऊसिंगजी रोड, सीपीआरमार्गे दसरा चौक असा होता. दरम्यान, छत्रपती राजाराम महाराज, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शरीयानी चौगुले व सिद्धी शिरगट्टी या बालिकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
दसरा चौक येथे रॅली विसर्जित झाली. शहाजी कॉलेजच्या तरुण-तरुणींनी पथनाट्याच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण का
हवे आहे, याचे दर्शन घडविले.
अत्यंत शिस्तबद्धरीत्या काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने महिला व तरुणी सहभागी झाल्या होत्या.
मोर्चाच्या अग्रभागी संयोगीताराजे छत्रपती या जीपमधून, तर महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, मधुरिमाराजे छत्रपती, अरुंधती महाडिक, प्रतिमा पाटील, वैशाली क्षीरसागर, माजी महापौर सई खराडे, मनीषा जाधव, स्नेहल पवार, वैष्णवीराजे दाभाडे, अरुणा घोरपडे, सरिता राजेभोसले, वृषाली कदम, आदी मान्यवर सकल मराठा महिला रॅलीमध्ये दुचाकीवर स्वार होऊन सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे या रॅलीत काही तरुणींनी बुलेटही आणल्या होत्या. या रॅलीने शहरातील एकूणच वातावरण मराठा मोर्चामय झाले होते.
यांचा सहभाग
सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूल, शाहू विद्यालय, तारा कमांडो फोर्स, मोहामेडन एज्युकेशन सोसायटीचे नेहरू विद्यालयाच्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. यासह अॅड. वृषाली देसाई, नीलांबरी गिरी, मेधा पाटील, पूजा कटके, मीना पोवार, सविता परब, मनाली भोसले, सरिता भोसले, चारूलता चव्हाण, मृदुला भोसले, अनुजा देशमुख, रूपाली पोवार, राधिका कुलकर्णी, आदी वकील महिला सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक दुचाकीच्या मागे बसलेल्या महिला, तरुणींकडे सामाजिक संदेश देणारे फलक होते.
रॅलीत शिस्तीचे पालन
४रॅलीची सुरुवात झाल्यानंतर सर्व महिलांनी गाड्यांचा वेग ३० कि.मी. प्रतिवेग ठेवला होता. बहुसंख्य महिलांनी पांढऱ्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या, तर प्रत्येक तरुणी, महिलांनी आपल्या उजव्या दंडावर काळी फीत लावून कोपर्डी अत्याचार घटनेचा निषेध नोंदविला.
पथनाट्याचे सादरीकरण
४छत्रपती शहाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मराठा आरक्षण व शेतकरी आत्महत्यांबद्दल दसरा चौक येथील मैदानावर पथनाट्य सादर केले. यामध्ये रविना पोवार, शिवानी भोई, ज्योती कापले, वैष्णवी चौगुले, अमित चव्हाण, गणेश कांबळे, रोहित कांबळे, नीलेश खोले, आदी विद्यार्थी सहभागी झाले होते.
मेकॅनिकचा सहभाग
४रॅलीतील महिलांच्या दुचाकी नादुरुस्त झाल्यातर त्या तत्काळ दुरुस्त करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा टू-व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचे संजय पाटणकर, रवी कोंडेकरी, माधव सावंत, बबन सावंत, आदी मेकॅनिक सहभागी झाले होते, तर विविध संस्थांच्यावतीने रॅलीत सहभागी झालेल्या महिला, तरुणींकरिता कोकम सरबत, पाण्याच्या पाऊचची सोय करण्यात आली होती.
१) मराठा मूक मोर्चासाठी सकल मराठा समाजाच्या रणरागिणींनी गुरुवारी सकाळी जनजागृतीसाठी दुचाकी रॅली काढली. यामध्ये संयोगीताराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, अरुंधती महाडिक, सई खराडे, महापौर अश्विनी रामाणे, प्रतिमा पाटील, शमा मुल्ला, आदी सहभागी झाल्या होत्या. २) मराठा मूक मोर्चासाठी सकल मराठा समाजाच्या रणरागिणींनी गुरुवारी सकाळी जनजागृतीसाठी दुचाकी रॅली काढली. या दरम्यान रॅली शिवाजी चौकात आल्यानंतर चिमुकलीच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अरुंधती महाडिक, संयोगीताराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, महापौर अश्विनी रामाणे, प्रतिमा पाटील, माजी महापौर सई खराडे, आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या.