पन्हाळ्यात सरपंच निवडीत जनसुराज्य आघाडीवर, ३६ गावांत सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:34 AM2021-02-26T04:34:31+5:302021-02-26T04:34:31+5:30
: पन्हाळा तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवड प्रक्रियेत जनसुराज्य पक्षाने आघाडी घेत ३६ ठिकाणी आपले सरपंच निवडले. कोडोलीचे ...
: पन्हाळा तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवड प्रक्रियेत जनसुराज्य पक्षाने आघाडी घेत ३६ ठिकाणी आपले सरपंच निवडले. कोडोलीचे सरपंचपद काँग्रेस पक्षाला मिळाले आहे.
पन्हाळा तालुक्यातील उंड्री गावामुळे रखडलेल्या सरपंच, उपसरपंच निवडी गुरुवारी झाल्या. उंड्री गावातील अजित खोत यांनी चुकीचे आरक्षण पडल्याचे सांगत न्यायालयात धाव घेतल्याने सरपंच निवडी महिनाभर पुढे गेल्या होत्या. उंड्री येथील अजित खोत हे सरपंचपदी निवडून येऊ शकले नाहीत. कोडोली ही तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येची ग्रामपंचायत असून, या ठिकाणी कोरे-पाटील गटाचे १५ सदस्य व विरोधी गटाचे दोन सदस्य आहेत. या ठिकाणी अमर पाटील यांनी आपल्या गटाच्या मनीषा पाटील यांना सरपंच केले, तर कोरे गटाचे निखिल पाटील हे उपसरपंच झाले. या ठिकाणी जरी युती असली, तरी काँग्रेसचा सरपंच झाल्याने जनसुराज्यचे अनेकजण नाराज झालेले दिसले. येथे अजूनही कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याची चर्चा होत होती.
शिवसेनेचे केवळ दोन ठिकाणी सरपंच झाले आहेत. यात कळे येथे अपेक्षेप्रमाणे जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील गटाकडे आठ जागा, तर विरोधी गटाकडे सात जागा आहेत. तिथे त्यांचा मुलगा सुभाष पाटील सरपंचपदी विराजमान झाले. पोर्ले गाव एकेकाळी जनसुराज्य पक्षाचा बालेकिल्ला होते. यावेळी स्थानिक आघाडीने वर्चस्व राखले. पोर्ले तर्फ ठाणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गीता तानाजी चौगुले यांची. तर उपसरपंचपदी अरुण पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
फोटो------- उंड्री गावात सरपंच निवडीनंतर गुलालाच्या उधळणीत निघालेली मिरवणूक.