‘जातपडताळणी’चा लिपिक जाळ्यात
By admin | Published: December 12, 2014 11:25 PM2014-12-12T23:25:00+5:302014-12-12T23:37:05+5:30
संशयित परभणीचा : ३५ बनावट वैधता प्रमाणपत्रे दिली; दोन अधिकाऱ्यांवर संशय
कोल्हापूर : कोल्हापुरातील विभागीय जातपडताळणी समिती क्रमांक दोन या कार्यालयामधील कनिष्ठ लिपिक संशयित अनिल हरीराव ढवळे ( वय ३९, सध्या राहणार भगवा चौक, कसबा बावडा, मूळ रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, आयटीआय रोड, परभणी) याला आज, शुक्रवारी शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. ढवळेने ३५ बनावट वैधता प्रमाणपत्र दिली असल्याची माहिती पुढे येत असून, यामध्ये दोन अधिकाऱ्यांकडे संशयाची सुई जात आहे.
गत आठवड्यात या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी सांगली जिल्ह्यातील संशयित बाळासाहेब ऊर्फ प्रशांत महादेव हारगे (३२, रा. सलगरे, ता. मिरज) व मुख्य सूत्रधार समीर बाबासो जमादार (२९, रा. मल्लेवाडी , ता. मिरज) यांना पकडले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपास केल्यानंतर कोल्हापुरातील विभागीय जातपडताळणी समिती क्रमांक दोन या कार्यालयामधील कनिष्ठ लिपिक संशयित अनिल ढवळे याचे या प्रकरणात नाव पुढे आले. त्याची खात्री केल्यानंतर त्याला आज पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडी दिली.
बनावट प्रमाणपत्र बनविणारी साखळीच
संशयित अनिल ढवळे हा २००८ पासून विभागीय जातपडताळणी समिती क्रमांक दोन या कार्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून काम करतो. त्याच्याकडे आलेल्या अर्जांची छाननी करून त्यामधील त्रुटी काढण्याचे काम तो करीत होता. त्रुटी काढून हा प्रकार तो संशयित हारगेला सांगत असे. हारगे हा संबंधित अर्जदाराला भेटून तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र देतो, असे सांगून पैसे घेत होता. त्यासाठी तो मुख्य सूत्रधार समीर जमादार याच्याकडून हे जातीचे बनावट वैधता प्रमाणपत्र करून घेत असे, अशी माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे.