आदिशक्तीचा आजपासून जागर

By admin | Published: October 13, 2015 12:58 AM2015-10-13T00:58:31+5:302015-10-13T01:03:07+5:30

नवरात्रौत्सव : अंबाबाई मंदिरात भरले उत्सवाचे रंग; भक्तांची गर्दी

Jasar from Adashakti today | आदिशक्तीचा आजपासून जागर

आदिशक्तीचा आजपासून जागर

Next

कोल्हापूर : आदिशक्तीचा जागर असलेल्या शारदीय नवरात्रौत्सवाला आज, मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. उत्सवाच्या पूर्वसंध्येला मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला तर आवारात भाविकांच्या गर्दीने आणि सर्वच यंत्रणांच्या लगबगीने उत्सवाचे रंग भरले आहेत.
आज, मंगळवारी सकाळी ८ वाजता तोफेच्या सलामीनंतर अंबाबाई मंदिरात घटस्थापना होईल. त्यानंतर जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते देवीचा शासकीय अभिषेक होईल. दुपारच्या आरतीनंतर अंबाबाईची आदिलक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात येईल. मंदिराच्या बाह्ण परिसरात दर्शनरांगा, मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्टेज उभारणी झाली आहे. सकाळी सात वाजल्यापासून येथे विविध कार्यक्रम सादर होतील. दर्शनरांगेमध्ये पाच एलसीडी लावण्यात येत असून त्याद्वारे विधींचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
लॉकर्ससाठी शेतकरी बझार..अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या परस्थ भाविकांच्या बॅगा ठेवण्यासाठी शिर्डी देवस्थानने लॉकर्स देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी देवस्थान समितीने भवानी मंडपातील शेतकरी बझारचा हॉल निश्चित केला आहे. मात्र, यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही. (प्रतिनिधी)

अशी आहे सुरक्षा व्यवस्था
नवरात्रौत्सव काळात अंबाबाई मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. यंदा प्रथमच महिलांच्या तपासणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत आहे. मंदिरात अंर्त-बाह्य परिसरात एकूण ३५ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यातील एक झूम कॅमेरा आहे.
मंदिराच्या चारही दरवाज्यांवर डोअर मेटल डिटेक्टर लावण्यात आले आहेत. याशिवाय हँड मेटल डिटेक्टर आहेत तसेच ३ पोलीस निरीक्षक,२१ पोलीस उपनिरीक्षक, २०० पोलीस कॉन्स्टेबल, ५० महिला पोलीस कॉन्स्टेबल,४० होमगार्ड, याशिवाय राज्य राखीव दलाची तुकडीदेखील असणार आहे, अशी माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी दिली.

वाद्यांच्या गजरात ज्योत मिरवणूक
साडेतीन शक्तिपीठ असलेल्या अंबाबाई मंदिरातून देवीची ज्योत नेण्यासाठी कोल्हापूरसह राज्यातील विविध जिल्ह्यांमधून भाविक दाखल झाले आहेत. संध्याकाळी लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगलीसह कंदलगाव, कोळेगाव अशा गावा-गावांतून आलेल्या मंडळांनी ‘आई राजा उदं उदं...’चा जयघोष करत ढोल-ताशांच्या निनादात ज्योत घेऊन आपल्या गावी रवाना झाले.


अपंग, वृद्धांसाठी स्वतंत्र सोय
देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या अपंग भाविकांना घाटी दरवाजातून मंदिरात प्रवेश दिला जाईल. त्यांच्या सोयीसाठी शनिमंदिर येथील दरवाज्यावर लाकडी रॅम्प उभारण्यात आला आहे. वृद्ध नागरिकांना महाकाली मंदिर येथून प्रवेश दिला जाईल.

पाण्याची मुबलक सोय
भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची मुबलक सोय करण्यात आली आहे. त्यासाठी देवस्थान समितीने दोन हजार लिटरच्या वाढीव दोन टाक्या दर्शनरांगांकडे बसविल्या आहेत. याशिवाय मंदिराच्या आवारात रामाचा पार येथे मनुग्राफ कंपनीने तर सरस्वती मंदिराकडील बाजूस परिसरातील दुकानदारांनी पाण्याची सोय केली आहे. बाह्ण परिसरात प्रजासत्ताक संस्थेसह, श्रीपूजक गजानन मुनिश्वर यांच्यावतीने पाण्याची सोय करण्यात आली आहे.

Web Title: Jasar from Adashakti today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.