जत्रा महाराष्ट्रात, शर्यतींचा थरार घुमला कर्नाटकात; शौकिनांनी लढविली नामी शक्कल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 03:54 PM2022-10-31T15:54:30+5:302022-10-31T15:54:54+5:30
गणपती कोळी कुरुंदवाड: बैलगाडी शर्यतीला बंदी असल्याने त्यालाही पर्याय म्हणून शौकिनांनी नामी शक्कल लढविली आहे. त्यामुळे जत्रा महाराष्ट्रातील आणि ...
गणपती कोळी
कुरुंदवाड: बैलगाडी शर्यतीला बंदी असल्याने त्यालाही पर्याय म्हणून शौकिनांनी नामी शक्कल लढविली आहे. त्यामुळे जत्रा महाराष्ट्रातील आणि शर्यती कर्नाटकात घेऊन शर्यतीची हौस फेडली. हेरवाड (ता. शिरोळ) येथील शर्यती आयोजकांची नामी शक्कलाची चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्रात विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यात बैलगाडी शर्यती शौकिनांची संख्या प्रचंड आहे. मात्र शर्यतीत बैलांना अमानुष मारहाण, ढकली लावणे, बैलांना करंट देणे यातून बैलांचा छळ होत असल्याने बैलगाडी शर्यतीला बंदी आहे. ग्रामीण भागात यात्रा, जत्रा, उरूस यांचा समारोप बैलगाडी शर्यतीने होतो. मात्र शर्यतीला बंदी असल्याने यात्रा, जत्रांतील उत्साहच ओसरला होता.
मात्र न्यायालयाने शर्यतीसाठी अटी घालून व जिल्हाधिकारी यांची रीतसर परवानगी घेऊन विना लाठीकाठी शर्यत भरविण्यास आयोजकांना परवानगी दिली आहे. परवानगीसाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असल्याने राज्यात कायदेशीर शर्यती दुर्मिळच झाल्या आहेत. याउलट शेजारील कर्नाटक राज्यात राजरोसपणे शर्यती सुरू असल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शर्यती शौकीन कर्नाटकात शर्यतीसाठी जात असतात.
हेरवाड येथे ग्रामदैवत संतूबाई यात्रा सुरू आहे. यात्रा समितीने विविध शर्यती, स्पर्धांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये बैलगाडी शर्यतीचाही समावेश होता. सर्व शर्यती गावात झाल्या मात्र बैलगाडी शर्यतीला बंदी असल्याने व शर्यतीविना यात्रा अपुरी वाटत असल्याने संयोजकांनी बैलगाडी शर्यत कर्नाटक हद्दीत घेऊन कायद्याला पळवाट शोधली. गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्नाटक हद्दीतील पाच मैलावरून शनिवारी शर्यती सोडून शर्यतीची हौस फेडली. त्यामुळे शर्यती शौकिनांच्या या अभिनव शक्कलीची चांगलीच चर्चा रंगली आहे.