जतच्या तरुणाकडून कोल्हापूरच्या दाम्पत्यास १५ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 11:54 AM2019-11-26T11:54:24+5:302019-11-26T11:55:34+5:30
कोल्हापूर : स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी भाड्याने राहून आई-वडिलांचे नाते असल्याचा विश्वास संपादन करून जतच्या तरुणाने कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील दाम्पत्याला ...
कोल्हापूर : स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी भाड्याने राहून आई-वडिलांचे नाते असल्याचा विश्वास संपादन करून जतच्या तरुणाने कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील दाम्पत्याला १५ लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले. संशयित विकास हुनाप्पा राठोड (वय २८, रा. लमनतांडा, ता. जत, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर सोमवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, संशयित विकास राठोड हा मार्च २०१७ ते ११ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत फिर्यादी कल्पना दिलीप साळोखे यांचे सरनाईक गल्ली, शिवाजी पेठ येथील घरी भाड्याने राहत होता. तो नरके फौंडेशन येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होता. त्याने घरामध्ये राहत असताना ओळख वाढवून तुम्ही माझे आई-वडील आहात, असे वारंवार सांगून कल्पना साळोखे यांचा विश्वास संपादन केला. मार्च २०१७ मध्ये नोकरीसाठी पैसे द्यावे लागणार आहेत. त्याकरिता १० लाख रुपयांची मागणी त्याने साळोखे यांच्याकडे केली. नोकरी लागल्यानंतर पैसे परत करतो, असे सांगितल्याने त्यास साळोखे कुटुंबीयांनी सहा लाख ५० हजार रुपये बँकेतून कर्ज काढून दिले. त्यानंतर वडगाव येथील शेतजमीन आपल्या नावे करण्यासाठी दोन लाख १० हजारांची गरज आहे. ती नावावर झाल्यानंतर विकून पैसे परत करण्याचे आमिष दाखवून पुन्हा पैसे घेतले. त्यानंतर लग्न ठरल्याचे सांगून पैसे घेतले. संशयित राठोड याने जमिनी एका सावकाराकडून सहा लाख रुपये कर्ज घेतल्याचे समजले. ती सोडविण्यासाठी आणखी पैशाची मागणी केली.
यावेळी कल्पना यांनी सोळा तोळे दागिने गहाण ठेवून पैसे दिले. बँक, फायनान्स कंपनी यांच्याकडे वेळोवेळी १५ लाख ७७ हजार २७४ रुपये राठोड याला दिले. त्याने घरभाडेही दिले नाही. पैशाची मागणी केली असता, तो टाळाटाळ करू लागला. आपली फसवणूक झाल्याचे समजताच साळोखे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव तपास करीत आहेत.