‘जवाहर’च्या एमडीसह दोघांवर गुन्हा
By admin | Published: January 26, 2017 01:01 AM2017-01-26T01:01:14+5:302017-01-26T01:01:14+5:30
सुनील पुजारी आत्महत्या प्रकरण : जुन्या नोटा बदलण्याच्या दबावातून नैराश्य
सांगली : फलटण (जि. सातारा) येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे निर्मिती व्यवस्थापक व मुख्य लेखाधिकारी सुनील पुजारी यांनी सांगलीतील तृप्ती लॉजमध्ये केलेल्या आत्महत्येमागील गूढ उकलले आहे. श्रीराम कारखान्याचे भागीदार तथा हुपरीच्या जवाहर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी (रा. बाणेर, पुणे) यांनी जुन्या नोटा बदलण्यासाठी दबाव आणल्याने आत्महत्या केल्याचे पुजारी यांनी लिहिलेल्या चिठ्ठीतून स्पष्ट झाले आहे. जोशी यांच्यासह कामगार हणमंत मुळीक यांनाही जबाबदार धरल्याने, दोघांविरुद्ध सांगली (पान १ वरून) शहर पोलिसांत बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील चिनार को-आॅपरेटिव्ह हौसिंग सोसायटीत राहणाऱ्या पुजारी यांनी १४ जानेवारीरोजी सांगलीतील मुख्य बस स्थानकाजवळील तृप्ती लॉजमध्ये विष प्राशन करुन आत्महत्या केली होती. पुजारी हे जवाहर कारखान्याचे कामगार होते. या कारखान्याने फलटण येथील श्रीराम कारखाना चालविण्यास घेतल्यानंतर, पुजारी यांची तेथे निर्मिती व्यवस्थापक म्हणून बदली करण्यात आली होती.
आत्महत्येपूर्वी पुजारी यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली होती, पण चिठ्ठीतील मजकुराबाबत कमालीची गोपनीयता बाळगली होती. त्यामुळे पुजारी यांच्या आत्महत्येचे गूढ वाढले होते. बुधवारी पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे व सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुर्जर यांनी पत्रकार बैठक घेऊन या चिठ्ठीतील रहस्य उघड केले.
सुनील पुजारी यांनी आत्महत्येपूर्वी सहापानी चिठ्ठी लिहिली होती. ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर श्रीराम कारखान्याचे भागीदार तथा जवाहर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांनी पुजारी यांच्याकडे तीन कोटी रुपये बदलण्यासाठी दिले होते. त्यापैकी सव्वा कोटी रुपये तीन बँकांत कारखान्याच्या खात्यावर जमा केले. या दबावातून नैराश्य आले, त्याचा ताण सहन न झाल्याने आत्महत्या करीत असल्याचे पुजारी यांनी म्हटले होते. श्रीराम कारखान्यातील कामगार हणमंत मुळीक (रा. सासकल, ता. फलटण, जि. सातारा) हा वारंवार आपल्याविरुद्ध पोलिसांत तक्रारी करतो, त्यामुळे आपल्या प्रतिमेला धक्का लागला आहे. जोशी व मुळीक हे दोघे आत्महत्येला जबाबदार असल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहिल्याचे उपअधीक्षक काळे यांनी सांगितले.
याप्रकरणी सांगली शहरचे पोलिस निरीक्षक अनिल गुर्जर यांनी फिर्याद दिली असून, कार्यकारी संचालक मनोहर जोशी व हणमंत मुळीक या दोघांविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केले, पैशाची विल्हेवाट लावण्यासाठी कारखान्याच्या वाहनाचा व कामगारांचा बेकायदा वापर केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. (प्रतिनिधी) नातेवाईकांचे मौन
सुनील पुजारी यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्या नातेवाईकांनाही तपासासाठी बोलाविले होते. पण ते आले नाहीत. त्यांनी फिर्यादही दिली नाही. आम्हाला काही बोलायचे नाही, असे सांगून ते या प्रकरणातून बाजूला झाले होते. त्यामुळेच या प्रकरणाची फिर्याद निरीक्षक गुर्जर यांनी दिली आहे. तसेच सांगली ग्रामीणचे पोलिस उपनिरीक्षक गायकवाड यांच्याकडे तपासाचे काम सोपविण्यात आल्याचेही डॉ. काळे यांनी सांगितले.
सव्वा कोटी झाले पांढरे!
मनोहर जोशी यांनी त्यांच्याकडील तीन कोटी रुपये बदलण्याचा तगादा पुजारी यांच्याकडे लावला होता. त्यापैकी सव्वा कोटी रुपये पुजारी यांनी फलटण येथील बँक आॅफ इंडिया, अॅक्सिस बँक व मालोजीराजे सहकारी बँकेतील कारखान्याच्या खात्यावर जमा केले. त्यानंतर उर्वरित रक्कमही बदलून द्यावी, यासाठी जोशी यांनी दबाव टाकला होता. याप्रकरणी कारखान्यातील काही कागदपत्रे पोलिसांनी सील केली आहेत. प्राथमिक तपास व आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून जोशी व मुळीक या दोघांची नावे समोर आल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपासात आणखी काही नावे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील, असेही उपअधीक्षक काळे यांनी सांगितले.