जवान प्रशांत जाधव यांना अखेरचा निरोप, वडिलांसह कन्येने दिला भडाग्नी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 03:35 PM2022-05-30T15:35:54+5:302022-05-30T15:36:46+5:30

लाडक्या सुपुत्राच्या दुःखाच्या वृत्ताने गेले तीन दिवस कुटुंबीयांसह गावात शोककळा पसरली होती. घरातील कर्ता व कुटुंबाचा आधार असणाऱ्या प्रशांत यांचे पार्थिव दर्शनासाठी दारात येताच आई, वडील, पत्नी व नातेवाइकांच्या आक्रोशाने उपस्थितांची मने हेलावून गेली.

Jawan Prashant Shivaji Jadhav who died in a bus accident in Leh Ladakh was cremated in a military crematorium | जवान प्रशांत जाधव यांना अखेरचा निरोप, वडिलांसह कन्येने दिला भडाग्नी

जवान प्रशांत जाधव यांना अखेरचा निरोप, वडिलांसह कन्येने दिला भडाग्नी

Next

हलकर्णी : लेह लडाखमध्ये बस अपघातात मृत्यू पावलेले जवान प्रशांत शिवाजी जाधव (रा. बसर्गे, ता. गडहिंग्लज) यांच्यावर जन्मगावी रविवारी लष्करी इतमामात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रशांत जाधव अमर रहे.. अमरे रहे'च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

गावातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढली होती. बेळगाव येथून सैन्य दलांच्या खास वाहनातून पार्थिव आणण्यात आले. यावेळी सुतकट्टी, मनगुत्ती, यमकनमर्डी, हत्तरकी, खानापूर व हलकर्णी येथे माजी सैनिकांनी पार्थिवास मानवंदना दिली.

प्रारंभी सैन्यदलाच्या नेतृत्वाखाली गावातून पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर एस. एम. हास्कूलच्या मैदानावर हजारोंच्या उपस्थितीत वडील शिवाजी जाधव व प्रशांत यांची अकरा महिन्यांची मुलगी नियती हिने पार्थिवास भडाग्नी दिली. पालकमंत्री सतेज पाटील, २२ मराठा लाईफ इन्फंट्रीचे लेफ्टनंट कर्नल नवीन एन, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, माजी राज्यमंत्री भरमू पाटील, वर्षादेवी नाडगोंडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.

एक कोटीच्या मदतीसाठी प्रयत्नशील : पालकमंत्री

माजी सैनिक शिवाजी जाधव यांना प्रशांत हे एकुलता होते. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असून, शासनाकडून एक कोटीची मदत मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

गर्दी अन् नियोजन

गडहिंग्लज विभागातील माजी सैनिक आणि नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. संभाव्य गर्दी ओळखून बसर्गेकरांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन व्यवस्थित व्हावे म्हणून उत्तम नियोजन केले होते.

नातेवाइकांचा आक्रोश

लाडक्या सुपुत्राच्या दुःखाच्या वृत्ताने गेले तीन दिवस कुटुंबीयांसह गावात शोककळा पसरली होती. घरातील कर्ता व कुटुंबाचा आधार असणाऱ्या प्रशांत यांचे पार्थिव दर्शनासाठी दारात येताच आई, वडील, पत्नी व नातेवाइकांच्या आक्रोशाने उपस्थितांची मने हेलावून गेली.

Web Title: Jawan Prashant Shivaji Jadhav who died in a bus accident in Leh Ladakh was cremated in a military crematorium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.