Kolhapur: जवान संदीप खोत यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 16:01 IST2024-12-09T16:00:56+5:302024-12-09T16:01:11+5:30
कसबा वाळवे : भारत माता की जय, वीर जवान अमर रहे'च्या जयघोषात, हजारोंच्या साक्षीने चांदेकरवाडी येथील जवान संदीप भिकाजी ...

Kolhapur: जवान संदीप खोत यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
कसबा वाळवे : भारत माता की जय, वीर जवान अमर रहे'च्या जयघोषात, हजारोंच्या साक्षीने चांदेकरवाडी येथील जवान संदीप भिकाजी खोत (वय ४२) यांना शासकीय इतमामात आज सोमवारी (दि.९) साश्रूपूर्ण नयनांनी निरोप दिला.
मद्रास इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये गेले २२ वर्षे कार्यरत असलेल्या संदीप यांचे कोलकता येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराने निधन झाले होते. त्यांचे पार्थिव रविवारी दिल्ली मार्गे पुणे येथे विमानाने व आज सकाळी दहाच्या सुमारास घरी आणले. यावेळी आई-वडील, पत्नी व नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले.
फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरवरून गावातून अंतयात्रा काढण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा उभारून लोकांनी पुष्पवृष्टी केली. अंत्यसंस्काराच्या ठिकाणी मान्यवरांनी मानवंदना दिली. संदीप यांचा बारा वर्षीय मुलगा हर्षवर्धन याने भडाग्नी दिला. जवान खोत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी परिसरातील आजी माजी सैनिक, १०९ बटालियन, मद्रास इंजिनिअरिंग रेजिमेंटचे प्रतिनिधी, माजी आमदार के. पी. पाटील, मालोजीराजे छत्रपती, राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख, उमेश भोईटे, सरपंच सीमा खोत व विविध संघटनांचे पदाधिकारी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.