जय सामंत यांना वसुंधरा सन्मान पुरस्कार
By Admin | Published: September 17, 2014 12:01 AM2014-09-17T00:01:54+5:302014-09-17T00:07:27+5:30
स्वातंत्र्यसैनिक दत्ता शिंदे यांच्या हस्ते वितरण-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव :
कोल्हापूर : किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत दिला जाणारा वसुंधरा सन्मान हा गौरव पुरस्कार ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. जय सामंत यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, शाहू स्मारक भवन येथे होणाऱ्या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी (दि. १८) ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ विश्वंभर चौधरी यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी किर्लोस्कर आॅईल इंजिन्सचे कार्यकारी संचालक आर. आर. देशपांडे असतील. उद्घाटन समारंभानंतर आरती कुलकर्णी निर्मित ‘नाते पश्चिम घाटाचे’ व संदेश कडूर यांच्या ‘नॅशनल अँथम’ या लघुपटांचे प्रदर्शन होणार आहे. महोत्सवाचा समारोप २१ तारखेला सायंकाळी पाच वाजता होणार असून, यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गांधीवादी दत्ता शिंदे यांच्या हस्ते डॉ. जय सामंत यांना वसुंधरा सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येईल. डॉ. जय सामंत यांनी प्राणिशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी व पुढे पीएच. डी. पूर्ण केली. मुंबई व शिवाजी विद्यापीठात प्राध्यापक, विभागप्रमुख म्हणून काम करण्याबरोबरच ते बीएनएचएससारख्या संस्थेचे संचालकही झाले. आपल्या पर्यावरणविषयक कामातून ते अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी सातत्याने जोडले गेले. तसेच १९९२ ला झालेल्या रिओ, ब्राझील येथील वसुंधरा परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान त्यांना मिळाला. केंद्र व राज्य शासनाच्या पर्यावरणविषयक समित्यांवर ते कार्यरत राहिले. पश्चिम घाट बचाव यात्रा, सायलेंट व्हॅली अशा उपक्रमांचे संयोजनही त्यांनी केले आहे. त्यांनी पन्नासहून अधिक संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून, अनेक संशोधन निबंध, लेख लिहिले आहेत. पत्रकार परिषदेस कृष्णा गावडे, संजय बाबर, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, सचिव दिलीप बापट, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) सेवानिवृत्तीनंतर प्रा. जय सामंत हे देवराई या संस्थेच्या माध्यमातून आजही कार्यरत आहेत. त्यांनी पर्यावरण क्षेत्रात दिलेल्या या योगदानाबद्दल त्यांना हा गौरव प्रदान करण्यात येणार आहे.