शरद पवारांच्या गाडीत जयकुमार..
By admin | Published: May 9, 2017 12:05 AM2017-05-09T00:05:57+5:302017-05-09T00:05:57+5:30
उदयनराजेंना कमळाचा हार ! : दोन राजकीय घटनांच्या चर्चेने सातारा जिल्हा ढवळला
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘न भूतो.. न भविष्यती’ अशा दोन राजकीय घटनांच्या चर्चेने सोमवारी संपूर्ण सातारा जिल्हा ढवळून निघाला. माणदेशातील बिदाल गावी श्रमदानाची पाहणी करताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या गाडीतून काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी प्रवास केला, तर ‘राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्षाचा त्याग करून थेट भाजपमध्ये प्रवेश करावा,’ असा दबाव खासदार समर्थकांकडून वाढला. ‘राजे भाजपच्या वाटेवर,’ अशा पोस्टही सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणावर फिरल्या.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सोमवारी माण तालुक्यातील बिदाल व किरकसाल येथील श्रमदानाच्या कामांची पाहणी केली. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे कट्टर विरोधक व काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरेही त्यांच्या समवेत होते. या काळात जयकुमार यांनी तालुक्यातील जलसंधारणांच्या कामांची माहिती खासदार शरद पवार यांनाही दिली. या दौऱ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व गोरे यांनी एकाच गाडीतून प्रवासही केला.
विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उभारलेले आमदार बंधू शेखर गोरे मात्र या दौऱ्यात नव्हते. आजपर्यंत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना अडचणीत आणण्याची एकही संधी जयकुमार यांनी सोडली नव्हती. या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या गाडीतून जयकुमारांचा प्रवास राजकीय पटलावर चर्चेचा विषय ठरला.
राजे, बाहेर पडा.. कार्यकर्त्यांचा वाढता दबाव
१ नगरपालिका अन् जिल्हा परिषद निवडणुकांपासून एकाच वेळी रामराजे अन् शिवेंद्रसिंहराजेंसह राष्ट्रवादीतील इतर नेत्यांशी पंगा घेणाऱ्या खासदार उदयनराजेंना सध्या कायद्याची लढाई लढावी लागत आहे.
२ ‘ज्या पक्षातील नेत्यांमुळे आपण अडचणीत आलो आहोत, त्या राष्ट्रवादीला रामराम ठोकून सत्ताधारी भाजप पक्षात प्रवेश करावा,’ असा दबाव राजे समर्थकांकडून वाढत चालला आहे. ‘राजे भाजपच्या वाटेवर,’ अशा पोस्टही सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणावर फिरू लागल्या आहेत.
३ मात्र, सध्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यात नसलेल्या उदयनराजेंची भूमिका अद्याप गुलदस्त्यातच आहे. या गटाचा निर्णय जवळपास निश्चित झाला असला तरी सातारा लोकसभा मतदारसंघात मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाणे कोणालाच परवडणारे नसल्याने हा निर्णय काही काळानंतर घेतला जाऊ शकतो, अशीही चर्चा सुरू आहे.