जयंत आसगावकर यांचे कोल्हापूरात जल्लोषी स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 06:56 PM2020-12-05T18:56:43+5:302020-12-05T18:58:01+5:30
पुणे शिक्षक मतदारसंघातून दणदणीत विजयी संपादन केल्यानंतर आमदार प्रा. जयंत आसगावकर यांचे शनिवारी सायंकाळी कोल्हापूरात आगमन झाले. त्यांचे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.
कोल्हापूर : पुणे शिक्षक मतदारसंघातून दणदणीत विजयी संपादन केल्यानंतर आमदार प्रा. जयंत आसगावकर यांचे शनिवारी सायंकाळी कोल्हापूरात आगमन झाले. त्यांचे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.
प्रा. आसगावकर यांनी शिक्षक मतदारसंघातून त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी दत्तात्रय सावंत यांचा साडे दहा हजार मताच्या फरकाने पराभव करून विजयी मिळवला. दोन दिवस मतमोजणी सुरू राहिल्याने शुक्रवारी सायंकाळी त्यांचा विजयी अधिकृतपणे जाहीर करण्यात आला.
त्यानंतर त्यांनी पुणे शहर कॉग्रेस कमिटीला भेट देऊन कॉग्रेस पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. त्यानंतर शनिवारी ते सकाळी कोल्हापूरकडे रवाना झाले. पुण्यातून येताना कराड येथे त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर दुपारी चार वाजता ते थेट अजिंक्यतारा येथे जाऊन पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर ते सायंकाळी पाच वाजता ताराराणी चौकात आले.
आमदार आसगावकर यांचे ताराराणी चौकात आगमन होताच समर्थकांनी एकच जल्लोष केला. फटाक्याची अतिषबाजी करत जोरदार स्वागत करण्यात आले. महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर मिरवणूकीस सुरूवात झाली. स्टेशनरोडवर मिरवणूक आल्यानंतर आमदार आसगावकर यांनी कॉग्रेस कमिटीत जाऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर मिरवणूक दसरा चौकात आली, येथे राजषिॅ शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
येथे मिरवणूकीची सांगता झाल्यानंतर ते ताराबाई पार्क येथील घरी गेले. राज्यमुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड, वसंतराव देशमुख, दादासाहेब लाड, एस. डी. लाड, उदय पाटील, के. के. पाटील, सुरेश संकपाळ आदी सहभागी झाले होते.