जयंत आसगावकर यांचे कोल्हापुरात जल्लोषी स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:25 AM2020-12-06T04:25:36+5:302020-12-06T04:25:36+5:30

कोल्हापूर : पुणे शिक्षक मतदारसंघातून दणदणीत विजय संपादन केल्यानंतर आमदार प्रा. जयंत आसगावकर यांचे शनिवारी सायंकाळी कोल्हापुरात आगमन झाले. ...

Jayant Asgaonkar's warm welcome in Kolhapur | जयंत आसगावकर यांचे कोल्हापुरात जल्लोषी स्वागत

जयंत आसगावकर यांचे कोल्हापुरात जल्लोषी स्वागत

Next

कोल्हापूर : पुणे शिक्षक मतदारसंघातून दणदणीत विजय संपादन केल्यानंतर आमदार प्रा. जयंत आसगावकर यांचे शनिवारी सायंकाळी कोल्हापुरात आगमन झाले. त्यांचे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.

प्रा. आसगावकर यांनी शिक्षक मतदारसंघातून त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी दत्तात्रय सावंत यांचा साडेदहा हजार मतांनी पराभव करून विजय मिळविला. दोन दिवस मतमोजणी सुरू राहिल्याने शुक्रवारी (दि. ४) सायंकाळी त्यांचा विजय अधिकृतपणे जाहीर केला. त्यानंतर त्यांनी पुणे शहर काँग्रेस कमिटीला भेट देऊन काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. त्यानंतर शनिवारी ते कोल्हापूरकडे रवाना झाले. पुण्यातून येताना कऱ्हाड येथे त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर दुपारी चार वाजता थेट ‘अजिंक्यतारा’ येथे जाऊन पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता ते ताराराणी चौकात आले. आमदार आसगावकर यांचे ताराराणी चौकात आगमन होताच समर्थकांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करीत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर मिरवणुकीस सुरुवात झाली. स्टेशन रोडवर मिरवणूक आल्यानंतर आमदार आसगावकर यांनी काँग्रेस कमिटीत जाऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर मिरवणूक दसरा चौकात आली. येथे त्यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड, वसंतराव देशमुख, दादासाहेब लाड, एस. डी. लाड, उदय पाटील, के. के. पाटील, सुरेश संकपाळ, आदी सहभागी झाले होते.

.........

फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. ताराराणी चौकासह पालकमंत्री सतेज पाटील यांच्या ताराबाई पार्क येथील ‘अजिंक्यतारा’ कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करीत गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.

‘करवीर’ला चार आमदार

जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढली असून, विधानसभेचे चार व विधान परिषदेचे दोन असे पक्षाचे सहा आमदार झाले. त्याचबरोबर करवीर तालुक्यात पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्यानंतर आसगावकर यांच्या रूपाने चौथे आमदार मिळाले.

डी. डी. आसगावकर असते तर..

डी. डी. आसगावकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला होता. त्यांना विधान परिषदेची संधी मिळावी, अशी शिक्षकांची इच्छा होती. ते नसेना, मुलगा आमदार झाला, आता डी. डी. आसगावकर असते तर...! अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.

Web Title: Jayant Asgaonkar's warm welcome in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.