महाविकास आघाडीपासून आणखी एक नेता दुरावणार; जयंत पाटलांनी सगळंच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 02:22 PM2024-03-26T14:22:40+5:302024-03-26T14:27:58+5:30
Jayant Patil : लोकसभेसाठी महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही.
Jayant Patil ( Marathi News ) : लोकसभेसाठी महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. तर दुसरीकडे काही दिवसापासून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्याआधीच महादेव जानकर महायुतीसोबत गेले आहेत. दरम्यान, आता महाविकास आघाडीतून आणखी एक बडा नेता बाहेर पडणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत आज राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माहिती दिली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी महाविकास आघाडीसोबत असल्याचे बोलले जात होते, पण त्यांनी हातकणंगले मतदारसंघात महाविकास आघाडीतून निवडणूक लढवण्यास नकार दिला असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.
चंद्रकांत खैरेंना उमेदवारी मिळणार, अंबादास दानवेंचा फोन बंद, शिंदे गटात जाणार? म्हणाले...
काही दिवसापूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्षव महादेव जानकर हे महायुतीमधून बाहेर पडून महाविकास आघाडीसोबत येणार असल्याचे बोलले जात होते, याबाबत त्यांनी खासदार शरद पवार ( Sharad Pawar) यांच्यासोबत बैठकाही घेतल्या होत्या, जानकर यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यांची आधी शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली यानंतर दोनच दिवसात महादेव जानकर यांनी महायुतीमधील नेत्यांची भेट घेतली. आपण महायुतीसोबतच राहणार असल्याचे जानकर यांनी सांगितले.
माजी खासदार राजू शेट्टींबाबत जयंत पाटील काय म्हणाले?
"हातकणंगलेमधून राजू शेट्टी आमच्याबाजूने लढावेत अशी आमची इच्छा होती, पण त्यांचा वेगळा पावित्रा दिसत आहे. शिवसेनेचे (Shiv Sena) नेते त्यांच्या संपर्कात होते. आम्हाला वाटत होतं की एकत्रित पणाने ते शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीत येतील. पण सध्या तसं दिसत नाही. त्यांनी पाठिंबा नाही घेतला तर मग महाविकास आघाडीला हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवार द्यावा लागेल, असंही जयंत पाटील म्हणाले. माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून उमेदवारी घेण्यास नकार दिला आहे. त्यांनी महाविकास आघाडीला ती जागा सोडण्यास सांगितले आहे.
वंचितबाबत चर्चा सुरू आहेत
वंचित बहुजन आघाडी आमच्यासोबत येण्यासाठी चर्चा सुरू आहेत. जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहेत, काही दिवसातच याबाबत निर्णय होईल, असंही जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.
जयंत पाटील म्हणाले, महादेव जानकर यांना आम्ही माढ्याची जागा सोडणार होतो, पण आता ते महायुतीमध्ये गेल्याने त्या जागेसाठी पुन्हा आम्ही चर्चा करणार आहोत.