प्रतीक पाटील यांच्या लोकसभा उमेदवारीबाबत जयंत पाटीलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 05:10 PM2023-09-19T17:10:54+5:302023-09-19T17:12:17+5:30
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतीक पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी
गणेशवाडी : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीकडून प्रतीक पाटील यांना उमेदवारी देण्याबाबतचा भूमिका योग्य वेळी घेतली जाईल. याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त शरद पवारांना आहे. ते योग्य वेळी निर्णय घेतील, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले.
औरवाड (ता. शिरोळ) येथे राज्यसभा खासदार डॉ. फौजिया खान यांच्या फंडातून हजरत शेख चाँद पीर दर्गा येथे सभागृह बांधकामासाठी दहा लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्याची पायाभरणी आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी माजी आमदार उल्हास पाटील, सांगलीचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, अशरफ पटेल प्रमुख उपस्थित होते.
माजी आमदार उल्हास पाटील यांनी येणाऱ्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या माध्यमातून पुरोगामी महाराष्ट्र घडविण्यासाठी जनतेने साथ द्यावी, असे आवाहन केले. या वेळी रोहित पाटील, मदन कारंडे, मैनुद्दीन बागवान यांनी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी अभिजित पवार, विक्रमसिंह जगदाळे, आबीद पटेल, माजीद पटेल, नागेश कोळी, किरण कांबळे, प्रशांत मंगसुळे, कमरूदीन पटेल, शहानवाज पटेल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
हातकणंगलेतून तिसरा पर्याय
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतीक पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी, अभिजित पवार, नागेश कोळी, हजरत पटेल यांच्यासह कार्यकर्त्यांनी केली. या वेळी आमदार जयंत पाटील यांनी याबाबत थेट नकार दिला नाही. मात्र, याबाबतचा निर्णय शरद पवार यांच्या कोर्टात ढकलला आहे. यामुळे हातकणंगलेतून तिसरा पर्याय म्हणून प्रतीक पाटील यांचे नाव पुढे येत आहे.