भादोले येथे जयंत पाटील यांची गाडी अडवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:26 AM2021-07-28T04:26:41+5:302021-07-28T04:26:41+5:30
भादोले : भादोले-आष्टा हा नव्याने रुंदीकरण झालेला रस्ता उंच केल्यामुळे आणि रस्त्याकडेला नाले व मोरी नसल्याने भादोलेतील शेकडो एकर ...
भादोले : भादोले-आष्टा हा नव्याने रुंदीकरण झालेला रस्ता उंच केल्यामुळे आणि रस्त्याकडेला नाले व मोरी नसल्याने भादोलेतील शेकडो एकर शेती पुरामुळे पाण्याखाली जाऊन नुकसान झाले आहे. याबाबत भादोले येथील शेतकऱ्यांनी कोल्हापूर दौऱ्यावर येत असलेले जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची गाडी रस्त्यात थांबवून भीषण परिस्थितीबाबत व्यथा मांडली. याबाबत प्रशासनास सूचना देत उपाययोजना करण्याचे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले.
पेठ वडगाव–आष्टा दरम्यान रस्ता रुंदीकरण करून नव्याने रस्ता केला आहे. या रस्त्याची उंची वाढविण्यात आल्यामुळे भादोले परिसरातील शेतीत गेल्या चार दिवसांत पुरामुळे पाणी तुंबून राहिले आहे. याबाबत जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची आष्ट्याहून पेठ वडगावकडे जात असलेली गाडी भादोले येथे शेतकऱ्यांनी अडवून त्यांना येथील शेकडो एकर शेतीचे झाले असल्याचे निदर्शनास आणून दिले.
रस्त्याकडेला दोन्ही बाजूंना नाले व मोरी बांधण्याबाबत व पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागास सूचना देऊन लवकरच कार्यवाही करीत असल्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.
यावेळी जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, युवा सेनेचे पदाधिकारी ओंकार कोळी, बी. के. पाटील, उदय माने, चंद्रकांत माने, शरद माने, राजाराम माने, सयाजी माने, श्रीकांत माने, आदी शेतकरी उपस्थित होते.
२७ भादोले
भादोले येथे मंत्री जयंत पाटील यांची गाडी अडवून शेतकऱ्यांनी पूरस्थिती मांडली.