तात्यांच्या निवडीत जयंतरावांची खेळी

By admin | Published: May 20, 2015 10:57 PM2015-05-20T22:57:52+5:302015-05-21T00:03:31+5:30

जिल्हा बॅँक अध्यक्ष निवड : इस्लामपूरच्या राजकारणाची झालर

Jayantrao's innings in the selection of Tatya | तात्यांच्या निवडीत जयंतरावांची खेळी

तात्यांच्या निवडीत जयंतरावांची खेळी

Next

अशोक पाटील - इस्लामपूर-स्वत:च्या इस्लामपूर मतदारसंघातील ताकद वाढविण्यासाठी दिलीपतात्या पाटील यांना जिल्हा बँकेचे अध्यक्षपद देऊन माजी मंत्री जयंत पाटील यांनी राजकीय खेळी खेळली आहे. भविष्यातील राजकीय धोके संपवण्यासाठीच त्यांनी हे पाऊल टाकले आहे. विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसमधील दिग्गजांना पराभव पत्करावा लागला. मात्र इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांनी बालेकिल्ला अबाधित ठेवला. या मतदार संघावरील पकड मजबूत करण्यासाठी पाटील यांनी वाळवा जिल्हा परिषद मतदार संघातील दिलीपतात्यांना बँकेवर संधी दिली आहे. यामागे दिलीपतात्यांचे वाळव्यातील विरोधक वैभव नायकवडी यांची ताकद कमी करण्याचाही डाव आहे.
वाळवा जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्वच गावांचा संपर्क आष्टा शहराशी आहे. आष्टा शहर इस्लामपूर मतदारसंघातील मोठे मतदान असणारे गाव आहे. या शहरात माजी आमदार विलासराव शिंदे यांच्यासह दिलीपतात्यांच्या गटाची ताकद आहे. दिलीपतात्या हे राजारामबापू पाटील यांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जातात. त्यांचा उल्लेख जयंत पाटील यांचे थोरले बंधू म्हणूनच केला जातो. त्यामुळे विश्वासू व निष्ठावान असलेल्या दिलीपतात्यांना बँकेवर संधी देऊन, विलासराव शिंदे आणि वैभव नायकवडी या गटांना शह देण्याची खेळी खेळली आहे.
प्रारंभीच्या टप्प्यात शिराळ्याचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी जोरदार चर्चा होती, परंतु राज्य सहकारी बँकेवर त्यांना संधी मिळू देण्यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्षपद दिले नसावे, असे सांगितले जाते. माजी अध्यक्ष बी. के. पाटील यांचे गाव कोरेगाव आहे. या गावात आर. के. पाटील आणि बी. के. पाटील यांचे स्वतंत्र गट कार्यरत आहेत. बी. के. पाटील यांना संधी दिली असती, तर दुसरा गट नाराज झाला असता. याचाही विचार जयंत पाटील यांनी केला असावा. शिकंदर जमादार हे मदन पाटील यांचे कट्टर समर्थक असून ते डिग्रजचे असल्याने त्यांचेही नाव आघाडीवर होते. परंतु भविष्यातील राजकारणात मदन पाटील यांच्या भूमिकेविषयी साशंकता असल्याने जमादार यांचाही पत्ता कटला आहे.
राजारामबापू पाटील यांचे मानसपुत्र असलेले दिलीपतात्या हे जयंत पाटील यांचे निष्ठावान समजले जातात. जयंत पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीतील आक्रमक प्रचारक म्हणून त्यांची ख्याती आहे. जयंत पाटील यांनी त्यांच्यावर दिलेली वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पेलली आहे. तोट्यात गेलेल्या सूतगिरण्या फायद्यात आणून त्यांनी कामाची चुणूक दाखवून दिली आहे. त्यांच्या अध्यक्षपद निवडीला कोणीही विरोध करणार नाही, हे ओळखून जयंत पाटील यांनी त्यांना संधी दिली आहे.
या माध्यमातून जयंत पाटील यांनी मतदारसंघावरील पकड मजबूत करण्याचा हेतू स्पष्ट होत आहे.

निष्ठा आणि आक्रमकता
राजारामबापू पाटील यांचे मानसपुत्र असलेले दिलीपतात्या हे जयंत पाटील यांचे निष्ठावान समजले जातात. जयंत पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीतील आक्रमक प्रचारक म्हणून त्यांची ख्याती आहे. जयंत पाटील यांनी त्यांच्यावर दिलेली वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पेलली आहे. तोट्यात गेलेल्या सूतगिरण्या फायद्यात आणून त्यांनी कामाची चुणूक दाखवून दिली आहे. त्यांच्या अध्यक्षपद निवडीला कोणीही विरोध करणार नाही, हे ओळखून जयंत पाटील यांनी त्यांना संधी दिली आहे.

Web Title: Jayantrao's innings in the selection of Tatya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.