‘जयप्रभा’प्रश्नी हेरिटेज कमिटीने कोल्हापूरचे हित पाहिले नाही : स्थायी सभेत आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 12:23 PM2020-01-30T12:23:20+5:302020-01-30T12:25:15+5:30
जयप्रभा स्टुडिओची जागा विभाजन करण्याबाबतचे पडसाद बुधवारच्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत उमटले. भूपाल शेटे यांनी प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार केला. ‘जयप्रभा’ प्रकरणी आयुक्त कार्यालयाकडून नगररचना कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला आहे. रामसिन्हा कन्स्ट्रक्शनकडून ही जागा विकसित करणे सुरू आहे.
कोल्हापूर : जयप्रभा स्टुडिओेची जागा वाचविण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. हेरिटेज कमिटीने निर्णय घेताना महापालिका अगर कोल्हापूरचे हित पाहिले नसल्याचा आरोप स्थायी समितीच्या सभेत करण्यात आला. या जागेच्या बदल्यात विकासकाला पर्यायी जागा अथवा टीडीआर का देण्यात आलेला नाही? हा प्रस्ताव धोरणात्मक निर्णयासाठी महासभेसमोर आणावा, अशी मागणी बुधवारी स्थायी समितीच्या सभेत अनेक सदस्यांनी केली. अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख हे होते.
जयप्रभा स्टुडिओची जागा विभाजन करण्याबाबतचे पडसाद बुधवारच्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत उमटले. भूपाल शेटे यांनी प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार केला. ‘जयप्रभा’ प्रकरणी आयुक्त कार्यालयाकडून नगररचना कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला आहे. रामसिन्हा कन्स्ट्रक्शनकडून ही जागा विकसित करणे सुरू आहे. ही स्टुडिओची जागा आरक्षित राहण्यासाठी यापूर्वी अनेक आंदोलने झाली. जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी विकासकाला २१ कोटी रुपये द्यावे लागण्याचा अभिप्राय नगररचना विभागाकडून दिला आहे; पण पैशाऐवजी त्यांना ‘टीडीआर’ देण्याबाबत वटमुखत्यारदाराशी प्रशासनाने कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही.
यापूर्वी टीडीआर अथवा पर्यायी जागा देण्याबाबत महासभेत मंजुरी दिलेली आहे; पण त्याची कार्यवाही ठेवली नसल्याबाबत शेटे यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच हेरिटेज कमिटीने दि. २५ जानेवारी २०१८ रोजी दिलेली मंजुरी चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले, कमिटीने निर्णय घेताना कोल्हापूरचे व महानगरपालिकेचे हित पाहिले नसल्याचाही आरोप केला. हा प्रस्ताव धोरणात्मक निर्णयासाठी महासभेसमोर आणावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. ‘जयप्रभा’च्या जागेबाबत अद्याप निर्णय घेतलेला नसून २१ कोटी रुपये देणे, पर्यायी जागा अथवा टीडीआर देणे याबाबत धोरणात्मक निर्णयाचा प्रस्ताव तयार केल्याचा प्रशासनाने खुलासा केला.
यावेळी राजारामपुरी-शास्त्रीनगर पाण्याच्या टाकीवरील पाणीपुरवठ्याचे नियोजन, शहरातील एलईडी बल्ब, स्पॉट बिलिंग काम नवीन २५ मशीनद्वारे वेगाने होणार, खानविलकर पेट्रोल पंपासमोरील रस्ता डांबरीकरण, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
महापालिकेची बनावट पावती
हॉटेल वेस्टेज गोळा करताना आठ ते १० हजारांची पावती ही बनावट दिली जाते; तसेच रुग्णालयाकडील वेस्टेज उचलणाऱ्या गाडीवर संगनमताने प्लास्टिक परस्पर बाहेर विकले जात असल्याचाही आरोप आरोप नियाज खान यांनी केला. अवनि संस्थेमार्फत हॉटेलचा कचरा गोळा केला जातो. त्यांच्याकडील पावत्या तपासून घेऊ, असे उत्तर प्रशासनाने दिले.
-------------
सेंट्रल किचनकडून दर्जेदार जेवण नसल्याची तक्रार
शाळेतील मुलांना सेंट्रल किचनकडून दर्जेदार जेवण मिळत नसल्याची तक्रार सविता भालकर यांनी केली. मुलांच्या जेवणात पैसे खाऊ नका. जेवणाबाबत हलगर्जीपणा खपवून घेणार नसल्याचा इशारा नियाज खान यांनी दिला. प्रत्येक शाळेत दोन सदस्य आठवड्यातून एकदा शाळेत जाऊन जेवणाची तपासणी करतील. जेवण दर्जेदार नसल्यास करवाई करू, असाही इशारा सभापती देशमुख यांनी दिला.