जयप्रभाची जागा ताब्यात घेता येणार नाही- -लता मंगेशकर यांच्या वकिलांचा युक्तिवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 06:48 PM2019-04-05T18:48:56+5:302019-04-05T18:51:12+5:30
जयप्रभा स्टुडिओ ही खासगी मालमत्ता असून त्यावर कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाही त्यामुळे ही जागा शासनाला ताब्यात घेता येणार नाही असा युक्तिवाद शुक्रवारी ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचे वकिल अॅड. महादेवराव आडगुळे यांनी केला
कोल्हापूर : जयप्रभा स्टुडिओ ही खासगी मालमत्ता असून त्यावर कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाही त्यामुळे ही जागा शासनाला ताब्यात घेता येणार नाही असा युक्तिवाद शुक्रवारी ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचे वकिल अॅड. महादेवराव आडगुळे यांनी केला. यावर मंगळवारी (दि.९) पुढील सुनावणी होणार आहे.
ज्या स्टुडिओत चित्रपटनिर्मिती करून भालजी पेंढारकर यांनी चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ दिला तो बेलबाग येथील जयप्रभा स्टुडिओ पाडून ही जागा बिल्डरला देण्याच्या निर्णयामुळे २०१४ साली कोल्हापुरात लता मंगेशकर यांच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभारले होते. त्यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने हा स्टुडिओ शासनाने ताब्यात घेवून त्याचा विकास करावा अशी याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची अंतिम सुनावणी सध्या कोल्हापुरातील न्यायालयात सुरू आहे.
शुक्रवारी झालेल्या सुनावणीत लता मंगेशकर यांच्यावतीने अॅड. महादेवराव आडगुळे यांनी बाजू मांडली. जयप्रभा स्टुडिओ ही खासगी मालमत्ता आहे. या जागेचा वापर केवळ चित्रपटसृष्टीसाठी व्हावा ही अट १९८२ सालीच काढूच टाकण्यात आली आहे. या जागेवर बागबगीचा व सांस्कृ तिक केंद्राचे २००६ साली टाकण्यात आलेले आरक्षणही २००८ मध्ये उठवण्यात आले आहे. त्यामुळे या जागेवर अन्य कोणत्याही व्यक्ती संस्था किंवा शासनाला आपला हक्क सांगता येणार नाही. तसेच अशा प्रकारची याचिका दाखल करण्यात अधिकार चित्रपट महामंडळाला नाही असा युक्तिवाद त्यांनी केला. सुमारे दीड तास त्यांनी म्हणणे मांडले. या विषयावर आता मंगळवारी (दि. ९) चित्रपट महामंडळाच्यावतीने अॅड. प्रकाश मोरे हे युक्तिवाद मांडणार आहेत. ही या प्रकरणाची अंतिम सुनावणी असणार आहे.