जयश्री जाधव काॅंग्रेसच्या उमेदवार, बिनविरोधचीही शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 05:42 PM2021-12-06T17:42:36+5:302021-12-06T19:31:26+5:30
भारत चव्हाण कोल्हापूर : गेल्या दहा-बारा वर्षांत काही कारणांनी निधन झालेल्या आमदार, खासदारांचा उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याच कुटुंबातील पत्नी, मुलगी ...
भारत चव्हाण
कोल्हापूर : गेल्या दहा-बारा वर्षांत काही कारणांनी निधन झालेल्या आमदार, खासदारांचा उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याच कुटुंबातील पत्नी, मुलगी किंवा मुलगा यांना उमेदवारी दिल्याच्या घटना पाहता, कोल्हापूर उत्तर मतदारसंघात त्याचीच पुनरावृत्ती होऊन जयश्री चंद्रकांत जाधव यांना काॅंग्रेसची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच अलिकडे सर्वच राजकीय पक्षांनी काही निवडणुका बिनविरोध करण्याचा पायंडा पाडला आहे. यामुळे जाधव यांची निवड बिनविरोध होवू शकते.
कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना आमदार करण्याचा विषय शोकसभेतून पुढे आला आहे. राज्यातील काही आमदार, खासदारांचे निधन झाले. त्यांचे उत्तराधिकारी कोण? हा प्रश्न समोर आला तेव्हा त्या-त्या पक्षाच्या नेतृत्वाने निधन झालेल्या आमदार किंवा खासदारांच्या कुटंबातच उमेदवारी दिली. केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी प्रीतम मुंडे यांना तर प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर मुलगी पूनम महाजन यांना भाजपने उमेदवारी दिली. भारत भालके यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांना तर आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमनताई, बाबा कुपेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी संध्यादेवी कुपेकर यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. दिलीप देसाई यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी शिवानी देसाई, संजयसिंह गायकवाड यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी संजीवनीदेवी गायकवाड यांना उमेदवारी दिली गेली. याचा विचार केला तर जयश्री जाधव यांना उमेदवारी मिळण्यात कोणतीच अडचण दिसत नाही.
जयश्री जाधव यांचा परिचय
जयश्री जाधव या मूळच्या आजऱ्याच्या. सुशिक्षित व सधन असलेल्या डॉ. शंकरराव माेरे घराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण बाारावीपर्यंत झाले आहे. वाचन आणि वक्तृत्व या विषयात त्यांना आवड आहे. २०१५मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या नगरसेविका म्हणून विजयी झाल्या.
भाजपचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. शोकसभेत चर्चा झाली. महाआघाडीचे काय ठरणार? त्यांच्याकडून काय प्रस्ताव येतो, यावर भाजप आपली भूमिका निश्चित करेल. जयश्री जाधव यांनी भाजप सोडलेला नाही आणि काॅंग्रेसमध्येही प्रवेश केलेला नाही. हेही महत्त्वाचे आहे. - राहुल चिकोडे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष
- पालकमंत्री सतेज पाटील यांनी चंद्रकांत जाधवना उमेदवारी मिळवून दिली.
- केवळ उमेदवारीच दिली नाही तर मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणले.
- त्यामुळे पालकमंत्री पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची.
- राज्यात सर्व पक्षांत बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न काहीअंशी यशस्वी.
- काॅंग्रेस - राष्ट्रवादी - शिवसेना यांच्यात एकवाक्यता झाली तर भाजपही तयार होण्याची शक्यता.