जयश्री जाधव यांना निवडून आणाच, ताकदीने कामाला लागा; उद्धव ठाकरे यांचे क्षीरसागर, संजय पवारांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 12:30 PM2022-03-22T12:30:46+5:302022-03-22T12:32:20+5:30

मुख्यमंत्री दालनात झालेल्या बैठकीत निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली

Jayshree Jadhav should be elected, CM Uddhav Thackeray order to Rajesh Kshirsagar, sanjay Pawar | जयश्री जाधव यांना निवडून आणाच, ताकदीने कामाला लागा; उद्धव ठाकरे यांचे क्षीरसागर, संजय पवारांना आदेश

जयश्री जाधव यांना निवडून आणाच, ताकदीने कामाला लागा; उद्धव ठाकरे यांचे क्षीरसागर, संजय पवारांना आदेश

Next

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना कोणत्याही परिस्थिती निवडून आणावेच लागेल, असा आदेश सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांना दिला. गाफील राहू नका, ताकदीने कामाला लागा, असेही त्यांनी सांगितले.

‘कोल्हापूर उत्तर’च्या जागेवर राजेक्ष क्षीरसागर यांनी दावा सांगितला होता. मात्र आघाडीच्या सूत्रानुसार ही जागा काँग्रेसला देण्यात आली. त्यामुळे क्षीरसागर काहीसे नाराज होते, जयश्री जाधव यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते नॉट रिचेबल होते. त्यानंतर रविवारी दुपारी झालेल्या आघाडीच्या मेळाव्याकडेही त्यांनी पाठ फिरवले होते. त्यामुळे आघाडीच्या पातळीवर काहीसी संभ्रमावस्था पसरली होती. या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी बोलवले.

त्यानुसार, सोमवारी दुपारी मुख्यमंत्री दालनात झालेल्या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, राजेश क्षीरसागर व संजय पवार यांच्यात बैठक झाली. यामध्ये निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली.

त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी खासदार राऊत, अरुण दुधवडकर, संजय पवार, राजेश क्षीरसागर यांच्या सोबत चर्चा केली. जयश्री जाधव या काँग्रेसच्या नव्हेतर शिवसेनेचा उमेदवार म्हणून ताकदीने कामाला लागा. गाफील राहू नका, कोणत्याही प्रकारची हयगय चालणार नाही. कोणत्याही परिस्थितीत जयश्री जाधव यांना निवडून आणावेच लागेल, असा आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला. सुमारे अर्धा तास बैठक झाली.

जाधव यांना आमदार करूनच मातोश्रीवर येऊ

जयश्री जाधव यांना आमदार करण्यासाठी दिवसरात्र एक करू, त्यांना आमदार करूनच ‘मातोश्री’वर घेऊन येऊ, अशी ग्वाही संजय पवार व क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिली.

Web Title: Jayshree Jadhav should be elected, CM Uddhav Thackeray order to Rajesh Kshirsagar, sanjay Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.