जयसिंगपूर होणार ‘ग्रीन सिटी’
By admin | Published: July 23, 2014 11:21 PM2014-07-23T23:21:52+5:302014-07-23T23:21:52+5:30
नगरपालिका : चार हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट
संदीप बावचे -जयसिंगपूर
शतकोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत जयसिंगपूरला ग्रीन सिटी बनविण्याचे ध्येय नगरपालिकेचे आहे. शहरात वृक्षलागवड आणि संगोपन ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरातील वृक्षारोपणाच्या या पर्यावरणपूरक चळवळीत सामाजिक संस्थांचा सहभाग अजूनही दिसलेला नाही.
शतकोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत जयसिंगपूर नगरपालिकेला वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून वृक्षलागवडीची मोहीम व्यापकपणे पालिका राबवत आहे. शहरात चार हजार झाडे लावली जाणार असून, वृक्षारोपणासाठी खड्डे काढण्यात येणार आहेत. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शहरातील सेवाभावी संस्था, सामाजिक संस्था, विविध संघटना, शिक्षण संस्था अशा अनेक घटकांना आवाहन केले जाणार आहे. जयसिंगपूर शहराला ग्रीन सिटी बनविण्याच्या दृष्टिकोनातून वृक्षारोपणासाठी रोपे लावून नागरिकांनी योगदान देण्याची गरज आहे.
गतवर्षी अडीच हजार झाडे लावण्यात आली होती. पालिकेने केलेल्या आवाहनानुसार विविध सामाजिक संस्थांनी रोपे दिली होती. शाळा, महाविद्यालय परिसरात रोपे लावण्यात आली. यावर्षी चार हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट असून, वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.
पालिकेच्या सर्वेक्षणानुसार शहरात २० हजारांहून अधिक झाडे आहेत. सर्वच प्रभागांत वृक्षलागवड केली जाणार आहे. ग्रीन सिटीच्या दृष्टिकोनातून हौसिंग सोसायटी, गृहनिर्माण संस्था, आदी ठिकाणी झाडे लावण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे.
वृक्षलागवड करत असताना पालिकेने नियोजन केले आहे. यामध्ये धार्मिक कारणासाठी आवश्यक असणारी रोपे, सावली देणारी, शहराचे सौंदर्य वाढविणारी रोपे, सुगंधी फुलांची रोपे, पक्षी मोठ्या प्रमाणात आकर्षित होणारी रोपे, आरोग्याच्या दृष्टीने आॅक्सिजन निर्मिती करणारी रोपे आणि डास प्रतिबंधात्मक रोपे शहरामध्ये लावली जाणार आहेत.
वृक्षलागवडीसाठी नागरिकांना प्रेरित करण्यात येणार आहे. गतवर्षी लावण्यात आलेली झाडे अत्यंत चांगल्या पद्धतीने संगोपित झाली. याही वर्षी पालिकेने शहराला ग्रीन सिटी बनविण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलले आहे. त्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. सामाजिक भावनेतून सर्वांनीच वृक्षलागवड व संगोपन करणे गरजेचे आहे.
- सुनीता खामकर, नगराध्यक्षा जयसिंगपूर