जयसिंगपुरात नाट्यगृह होणार
By admin | Published: October 1, 2015 11:19 PM2015-10-01T23:19:07+5:302015-10-01T23:37:57+5:30
अंतिम टप्प्यातील निधीची प्रतीक्षा : जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर निविदा निघणार
संदीप बावचे --- जयसिंगपूर---शासनाच्या विविध योजनांमुळे नगरपालिका कार्यक्षेत्रात विकासकामांना प्राधान्य मिळाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या याच वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सुमारे सहा कोटी ४० लाख रुपये खर्चाचे नाट्यगृह जयसिंगपूर येथे बांधण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात दोन कोटी ४८ लाख रुपये खर्चातून इमारत उभारण्यात आली आहे. अंतर्गत सजावटीसाठी दुसऱ्या टप्प्यांतील एक कोटी ४० लाख रुपयांची कामे पूर्णत्वास येत असून, तिसऱ्या टप्प्यांतील निधी उपलब्ध झाल्यानंतर अत्याधुनिक व अद्ययावत असे नाट्यगृह प्रेक्षकांसाठी खुले होणार आहे.
शासनाच्या विविध योजनांमुळे नगरपालिकांना शहरात विकास साधण्यास मदत झाली आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजना, नगरोत्थान योजना यांसह अन्य योजनांमधून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाल्यामुळे जयसिंगपूर शहराच्या विकासात भर पडली आहे. शहराच्या वैभवात भर टाकणारा अशाच वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील नाट्यगृहाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या अंतर्गत सजावटीचे काम सुरू असून स्व. शामराव पाटील-यड्रावकर नाट्यगृह म्हणून नावारूपास येणार आहे. दोन वर्षांपूर्वी या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. दोन कोटी ५० लाख रुपये खर्चाचे हे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यांतील एक कोटी ५० लाख रुपयांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
सहा गुंठे क्षेत्रात हे नाट्यगृह बांधण्यात येत आहे. वातानुकूलित, अद्ययावत असणाऱ्या या नाट्यगृहाबरोबरच पार्किंग व्यवस्था, तळगृहात सभागृह, पार्किंग अशी सुसज्ज इमारत उभारण्यात येत आहे.
याठिकाणी सात दुकान गाळे देखील उभारण्यात येणार आहेत. तिसऱ्या टप्प्यांतील एक कोटी निधीच्या निविदा प्रक्रियेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे, असे एकूण पाच कोटी रुपयांचा निधी नाट्यगृहासाठी खर्च केला जाणार आहे. एकूण निधीपैकी दहा टक्के निधी नगरपालिका खर्च करणार असून, उर्वरित ९० टक्के निधी शासनाकडून मिळाला आहे.