जयसिंगपूर : हे सातशे विद्यार्थी एसटीने करतात 'फ्री 'प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:49 PM2018-12-14T23:49:29+5:302018-12-14T23:50:35+5:30
संदीप बावचे। जयसिंगपूर : राज्य सरकारने घोषित केलेल्या दुष्काळसदृश तालुक्यांतील विद्यार्थ्यांना उर्वरित शैक्षणिक वर्षासाठी मोफत पास योजनेची अंमलबजावणी शिरोळ ...
संदीप बावचे।
जयसिंगपूर : राज्य सरकारने घोषित केलेल्या दुष्काळसदृश तालुक्यांतील विद्यार्थ्यांना उर्वरित शैक्षणिक वर्षासाठी मोफत पास योजनेची अंमलबजावणी शिरोळ तालुक्यात सुरू झाली आहे. नांदणी व नृसिंहवाडी सर्कल अंतर्गत सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी शैक्षणिक मोफत पास योजनेचा लाभ घेतला आहे. जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून पास काढत आहेत, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळाला आहे. अन्य शासकीय ज्या सवलती आहेत, त्यांचीही अंमलबजावणी करावी, अशी मागणी या दोन सर्कलमधील गावातील नागरिकांतून होत आहे.
तालुक्यातील ज्या महसुली मंडळांमध्ये सरासरी पर्जन्याच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान साडेसातशे मिलिमीटरपेक्षा कमी झाला आहे अशा महसुली मंडळातील गावांत दुष्काळ घोषित करून शासनाने सुमारे आठ सवलती जाहीर केल्या आहेत. शिरोळ तालुक्यात एस. टी. विभागाने ही सवलत सुरू करून आपली कार्यवाही केली आहे.
शालेय, महाविद्यालयीन आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक पासमध्ये राज्य परिवहन विभागातर्फे ६६.६७ टक्के सवलत दिली जाते. दुष्काळसदृश म्हणून घोषित केलेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना उर्वरित शैक्षणिक वर्षासाठी ही सवलत शंभर टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. नृसिंहवाडी सर्कल अंतर्गत येणाºया औरवाड, गौरवाड, आलास, बुबनाळ, कवठेगुलंद, शेडशाळ, गणेशवाडी व बस्तवाड, तर नांदणी सर्कल अंतर्गत नांदणी, हरोली, जांभळी, धरणगुत्ती, चिपरी, कोंडिग्रे, निमशिरगांव, तमदलगे, गावांतील विद्यार्थ्यांना मोफत एस. टी. पास योजनेचा लाभ मिळाला आहे
दुष्काळसदृश अंतर्गत सवलती
जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जांचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीत स्थगिती, कृषीपंपाच्या चालू बिलात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषांत काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावांत शेतकºयांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे, अशा सवलतींचा समावेश आहे. नांदणी व नृसिंहवाडी सर्कल अंतर्गत दुष्काळसदृश म्हणून शासनाने सवलती जाहीर केल्या आहेत.
अंमलबजावणीची गरज
राज्य शासनाने राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला होता. याव्यतिरिक्त राज्यातील इतर तालुक्यांतील महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत कमी पर्जन्यमान झालेल्या ठिकाणी दुष्काळ घोषित केला आहे. याचा फायदा शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी व नांदणी महसुली मंडळाला झाला आहे. त्यामुळे आठ सवलतींचा फायदा या सर्कलमधील महसुली गावांना होणार आहे. या सवलतींची देखील अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.