जयसिंगपुरात आॅनलाईन तक्रारी मांडता येणार
By admin | Published: May 18, 2016 10:45 PM2016-05-18T22:45:02+5:302016-05-19T00:41:13+5:30
सिस्टीमचा उद्या प्रारंभ : माझी पालिका ‘अॅप’ प्रणाली; राज्यात दुसरी, जिल्ह्यातील पहिली नगरपालिका
संदीप बावचे --जयसिंगपूर --पथदिवे अॅटोमेटिक सिस्टीमद्वारे चालू बंद करण्याच्या स्काडा सिस्टीम प्रणालीनंतर आता जयसिंगपूर नगरपालिकेने ‘माझी पालिका’ या आॅनलाईन प्रणालीद्वारे अॅन्ड्रॉईड अॅप्लिकेशन सिस्टीमप्रणाली सुरू केली आहे़ या सिस्टीमद्वारे प्रभागातील आॅनलाईन तक्रारी नगरपालिकेकडे मांडता येणार आहेत़ राज्यात जेजुरीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात ही सिस्टीम राबविणारी जयसिंगपूर नगरपालिका पहिली ठरणार आहे़ शासनाच्या विविध योजनांतून नाट्यगृहे, भाजीमंडई, यात्री निवास, अग्निशामक केंद्र, जलवाहिनी, रस्ते यांसह कोट्यवधी रुपयांची विकासकामे शहरात झाली आहेत़ वाढत्या शहरीकरणामुळे लोकसंख्येत देखील वाढ झाली आहे़ प्रभागातील नागरिकांच्या समस्या व तक्रारी जाणून घेण्यासाठी जयसिंगपूर नगरपालिकेने ‘माझी पालिका’ याअंतर्गत अॅन्ड्राईड अॅप्लिकेशन ही सिस्टीम सुरू केली आहे़ याअंतर्गत नागरिकांना आॅनलाईन तक्रारी मांडता येणार आहेत़ या तक्रारी फोटो अथवा व्हिडिओ क्लिपद्वारेदेखील अपलोड करता येणार आहेत़ ज्या विभागाशी संबंधित तक्रार असेल त्या विभागाला तो मेसेज जाणार आहे़ त्यानंतर संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी काही कालावधी ठरविण्यात आला आहे़ तक्रारीनुसार काम झाले नाही, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तसा मेसेज पोहोचणार आहे़
अॅन्ड्रॉईड अॅपमध्ये सुमारे नऊ प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत़ विभाग निवडा याअंतर्गत तक्रारींचा प्रकार, प्रभाग, क्षेत्र, तक्रार तपशील, फोटो किंवा व्हिडिओ क्लिप आॅनलाईन अपलोड करता येणार आहेत़ जन्म-मृत्यू दाखला देखील पाहता येणार आहे़ शिवाय प्रॉपर्टी कर, जुन्या तक्रारी त्यांची सद्य:स्थिती यामध्ये समजणार आहे़ नगरसेवक, स्थायी समितीचे सदस्य यांची नावे, मोबाईल नंबरदेखील यामध्ये पाहता येणार आहेत़ नगरपालिकेअंतर्गत झालेले प्रकल्प, चालू प्रकल्प व भावी प्रकल्प यांची माहितीदेखील अपलोड करण्यात आली आहे़ ज्याला ज्या रक्तगटानुसार रक्ताची गरज आहे, अशा गटाच्या व्यक्तीचे नाव व मोबाईल नंबरदेखील उपलब्ध असणार आहेत़ या अॅप अंतर्गत जयसिंगपूर नगरपालिकेच्या फेसबुक, ट्विटर व वेबसाईडलादेखील भेट देता येणार आहे़ अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करणाऱ्यांकडून अभिप्राय व सूचनादेखील मांडता येणार आहेत़ एकूणच डिजिटल शहरासाठी पालिकेकडून राबविला जाणारा हा उपक्रम कौतुकास्पद आहे़
गैरप्रकार टाळता येणार
‘माझी पालिका’ अंतर्गत असलेल्या या ‘अॅप’चा वापर शहरापुरता मर्यादित ठेवण्यात आला आहे़ चुकीची माहिती आणि गैरप्रकार टाळण्यासाठी शहराबाहेर हा ‘अॅप’ उघडला जाणार नाही, अशी सिस्टीम यामध्ये वापरण्यात आली आहे़ उद्या, शुक्रवारी हा ‘अॅप’ जयसिंगपूर शहरवासीयांच्या सेवेत दाखल होणार आहे़
‘अॅप’ची सुविधा
‘माझी पालिका’ याअंतर्गत अॅन्ड्रॉईड अॅप्लिकेशन संदर्भातील माहिती डाऊनलोड करण्यासाठी संगणक विभागाला सुमारे एक महिनाभर यावर काम करावे लागले आहे़ पुणे येथील एका कंपनीने ‘अॅप’चे सॉफ्टवेअर करून दिले आहे़ गुगलवर गेल्यानंतर ‘जयसिंगपूर नगरपरिषद’, असे टाईप केल्यावर ‘माझी पालिका’ हा अॅप उपलब्ध होतो. त्यानंतर आपल्याला तो डाऊनलोड करता येणार आहे़