जयसिंगपूरची पशु चिकित्सालय इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
By admin | Published: June 19, 2015 12:11 AM2015-06-19T00:11:33+5:302015-06-19T00:18:19+5:30
अडीच कोटी खर्च : कारभार अद्ययावत होणार
संदीप बावचे- जयसिंगपूर -शहरातील लघु पशु सर्व चिकित्सालय या तालुका रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. शासनाच्या अडीच कोटी रुपयांच्या निधीतून सुसज्ज अशी इमारत उभारण्यात आली आहे. मात्र, फर्निचर या सामग्रीसाठी आणखीन निधीची गरज आहे. नवीन इमारतीप्रमाणेच कारभारदेखील तितकाच अद्ययावत असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सांगली-कोल्हापूर महामार्गावर प्रथमवर्ग न्यायालयाच्या शेजारी शिरोळ तालुका लघु पशु सर्व चिकित्सालय रुग्णालयाची जुनी इमारत होती. सुरुवातीला जिल्हा परिषदेचा दवाखाना याठिकाणी कार्यरत होता. १९९५ मध्ये तालुका लघु पशु सर्व चिकित्सालय असे नामकरण झाले. ४२ गुंठे क्षेत्र असलेल्या जागेमध्ये आस्थापना विभाग, जनावरांसाठी तपासणी विभाग असे कामकाज येथून चालत होते. तालुक्यातील १६ पशुवैद्यकीय रुग्णालयांवर या कार्यालयाचे नियंत्रण असते.
तीन वर्षांपूर्वी शासनाच्या जिल्हा नियोजन समितीअंतर्गत नवीन इमारत बांधकाम, शस्त्रक्रिया विभाग, अधिकारी, कर्मचारी यांच्या निवासस्थानासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, या ४२ गुंठे जागेवर नगरपालिकेचे आरक्षण पडल्यामुळे निधी मंजूर असूनही बांधकाम करण्यास शासकीय अडचणी येत होत्या. न्यायालयीन लढाईनंतर या जागेवरील आरक्षण एप्रिल २०१३ मध्ये उठले. यामुळे नवीन इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा झाला होता. या निधीअंतर्गत
स्वतंत्र रुग्णालय यामध्ये
बाह्यरुग्ण, आंंतररुग्ण, एक्सरे व शस्त्रक्रिया विभाग त्याचबरोबर अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली
आहेत. (प्रतिनिधी)