जयसिंगराव पवार, रमेश जाधव यांना ‘राजर्षी शाहू विचार पुरस्कार’ जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 01:53 AM2019-06-18T01:53:03+5:302019-06-18T01:54:10+5:30
छत्रपती शाहू महाराज यांना २५ एप्रिल १९१९ ला कानपूर येथे कुर्मी समाजाने ‘राजर्षी’ ही पदवी दिली. त्याला शंभर वर्षे झाली आहे. या समाजाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुवारी (दि. २०) सायंकाळी ५.३० वाजता शाहू स्मारक येथे ‘राजर्षी कृतज्ञता परिषद’
कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज यांना २५ एप्रिल १९१९ ला कानपूर येथे कुर्मी समाजाने ‘राजर्षी’ ही पदवी दिली. त्याला शंभर वर्षे झाली आहे. या समाजाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुवारी (दि. २०) सायंकाळी ५.३० वाजता शाहू स्मारक येथे ‘राजर्षी कृतज्ञता परिषद’ आयोजित केली आहे. राजर्षी शाहू सामाजिक सलोखा मंच व मराठा महासंघातर्फे त्याचे आयोजन केले आहे, अशी माहिती निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी सोमवारी दिली.
यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार व डॉ. रमेश जाधव यांना ‘राजर्षी शाहू विचार पुरस्कार’ देण्यात येणार असल्याची घोषणा मुळीक यांनी केली. त्याचबरोबर व्यंकाप्पा भोसले, डॉ. टी. एस. पाटील, भिकशेठ पाटील, सतीश रणदिवे, डॉ. पद्मा पाटील, शाहूभक्त कै. गंगाराम कांबळे यांचे कुटुंबीय व शाहूकालीन संस्था, वसतिगृह, संशोधन केंद्र, शाहू विचारांने कार्यरत संस्थांना ‘राजर्षी शाहू सन्मानपत्र’ देण्यात येणार आहे.
मुळीक म्हणाले, या परिषदेसाठी अध्यक्षस्थान शाहू छत्रपती भूषविणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, प्रमुख उपस्थिती अ.भा. कुर्मी क्षत्रिय महासभेचे राष्टÑीय अध्यक्ष एल. पी. पटेल, मंडल अध्यक्ष कैलाशचंद्र पटेल, डॉ. राजकुमार सचान, संजेशकुमार कटियार, अॅड. शशिकांत सचान आदींची राहणार आहे. यावेळी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, बबन रानगे, शिवमूर्ती झगडे, कादर मलबारी, प्रताप नाईक, शरद साळुंखे, प्रशांत बरगे, शंकरराव शेळके, अवधूत पाटील, रामचंद्र पोवार उपस्थित होते.
राजर्षी पदवी शताब्दीनिमित्त असे होणार उपक्रम
२० जून : सकाळी १० ते २ - कुर्मी बांधवांसमवेत शाहू जन्मस्थळ, न्यू पॅलेस भेट
२१ जून : १० ते ४ - शाहू समाधी स्थळ, जुना राजवाडा भेट
२३ जून : १० ते ८ - शाहूचित्र प्रदर्शन (राजर्षी छत्रपती शाहू स्मारक कलादालन)
२५ जून : सायंकाळी ७ - अग्निदिव्य शाहूंच्या जीवनावरील वैचारिक नाटक (संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह)
२६ जून : सकाळी ८ - राजर्षी शाहू जयंती
३० जून ते १५ जुलै : शाहू जीवनावर आधारित जिल्हास्तरीय शालेय विद्यार्थी वक्तृत्व, निबंध, चित्रकला स्पर्धा