गुन्ह्यात जप्त केलेले दागिने दिले दुस-यालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:24 AM2021-05-26T04:24:39+5:302021-05-26T04:24:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : चोरीतील जप्त दागिने मूळ मालकाला परत देण्याचे न्यायालयाने आदेश देऊन दीड वर्ष उलटले तरीही ...

The jewelery confiscated in the crime was given to another | गुन्ह्यात जप्त केलेले दागिने दिले दुस-यालाच

गुन्ह्यात जप्त केलेले दागिने दिले दुस-यालाच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : चोरीतील जप्त दागिने मूळ मालकाला परत देण्याचे न्यायालयाने आदेश देऊन दीड वर्ष उलटले तरीही ते परत केले नाहीत. त्याशिवाय करवीर पोलिसांच्या शिल्लक मुद्देमालातूनही ते सोन्याचे दागिने गायब झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी सखोल चौकशी करून त्याबाबतचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे सादर केला. त्या अहवालानुसार तो ३९ ग्रॅमचा सोन्याचा दागिना घरफोडीच्या गुन्ह्यात दुस-यालाच दिल्याचे स्पष्ट झाले. तो मुद्देमाल मूळ मालकास देण्याऐवजी दुस-याच गुन्ह्यातील अर्जदाराला देण्याचा कारकुनी तिढा दिसून आला. याप्रकरणात संबंधित तत्कालीन कारकुनाचे चूक केल्याचे निदर्शनास आले.

चोरीतील जप्त केलेले सोन्याचे दागिने मालकाला परत करण्याचा न्यायालयाने आदेश दिला, तरीही ते देण्यास करवीर पोलिसांकडून टाळाटाळ होत होती. याबाबत गेली सात वर्षे सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची फरपट सुरू असल्याची व्यथा ‘लोकमत’ने दि. १० मे रोजी मांडल्यानंतर प्रकरणाला वाचा फुटली.

पाचगाव (ता. करवीर) येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक अशोक बाबूराव येणेचवंडीकर हे सध्या बसर्गे (ता. गडहिंग्लज) या मूळ गावी राहतात. त्यांची मुलगी पुष्पावती परशराम ठबे (रा. पुणे) ह्या पाचगाव येथे माहेरी आल्या, त्यावेळी दि. २९ मे २०१२ रोजी रायगड कॉलनीत दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील ३९ ग्रॅमचे सोन्याचे गंठण चोरून नेले. पुष्पावती येणेचवंडीकर (माहेरचे नाव) यांनी करवीर पोलिसात तक्रार नोंदवली. चोरटे पकडले, सोन्याचे गंठणही जप्त केले. गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले. दि. ४ डिसेंबर २०१९ रोजी ते दागिने परत देण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने पोलिसांना दिले. पण पोलिसांनी दागिने देण्यास टाळाटाळ केली. याप्रकरणी ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर याबाबत चौकशीचे आदेश पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी दिले होते. त्याप्रमाणे करवीर पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी संबंधित प्रकरणात तत्कालीन कारकुनाची सखोलपणे चौकशी केली. त्यानंतर तो चौकशी अहवाल अधीक्षक बलकवडे यांच्याकडे सादर केला.

चौकशी अहवालात, चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील पोलिसांनी येणेचवंडीकर यांचे जप्त केलेले सोन्याचे गंठण हे २०१८ मध्येच एका घरफोडीच्या गुन्ह्यातील फिर्यादीस दिल्याचे स्पष्टपणे नमूद केले. त्यामुळे या अहवालावर अधीक्षक बलकवडे हे निर्णय घेतील.

म्हणे, घरफोडीतील दागिने जप्तच केलेच नाहीत

करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच दरम्यान झालेल्या घरफोडीतील सोन्याचे दागिने चोरट्याकडून जप्त केल्याचा अहवाल पोलिसांनीच न्यायालयात सादर केला. घरफोडीतील जप्त मुद्देमालात ‘चेनस्नॅचिंग’ गुन्ह्यातील जप्त केलेले येणेचवंडीकर यांचे सोन्याचे गंठण दाखवल्याचे व त्यातील फिर्यादीला ते सोन्याचे गंठण दिल्याचे चौकशी अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे.

Web Title: The jewelery confiscated in the crime was given to another

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.