सोनगे शाळेसमोरच जनावरांची दावण
By admin | Published: January 1, 2017 11:27 PM2017-01-01T23:27:04+5:302017-01-01T23:27:04+5:30
ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश
म्हाकवे : सोनगे (ता. कागल) येथील प्राथमिक शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासह आजूबाजूला जनावरे बांधण्याचा अड्डा बनविला आहे. याठिकाणी बैलांसह म्हैस, गाय, आदी जनावरे दिवसभर बांधली जातात. त्यामुळे शाळेत ये-जा करताना मुलांना या जनावरांकडून धोका उद्भवू शकतो.
याबाबत पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, ही जनावरे शाळेसभोवती न बांधता ती अन्यत्र बांधण्यात यावीत, यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही ग्रामस्थांतून होत आहे.
सोनगे येथे पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे. या शाळेत १७० हून अधिक विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी दररोज येतात; परंतु शाळेच्या प्रवेशद्वारासह अवतीभोवती ग्रामस्थ आपली जनावरे बांधतात. येथूनच विद्यार्थी ये-जा करतात किंवा खेळत असतात. अशावेळी या जनावरांकडून त्यांना धोका उद्भवू शकतो. तसेच सततपणे ही जनावरे येथे बांधल्याने शेणाचाही वास सुटलेला असतो. मुख्य प्रवेशद्वारावर नेहमीच दोन गायी आणि दोन बैल बांधलेले असतात, तर आजूबाजूला चार ते पाच जनावरे बांधलेली असतात. त्यांनी न खाल्लेला चाराही शाळेजवळ पडलेला असतो. (वार्ताहर)
अनर्थ होण्याअगोदर सावधानतेची गरज
गोठ्यातील जागा बदल म्हणून सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत ही जनावरे घराबाहेरच बांधली जातात; परंतु यापूर्वी २००० मध्ये चिखलीहून येथे शिक्षणासाठी आलेल्या पंकज चव्हाण या विद्यार्थ्याला येथील जनावरांचे शिंग लागल्याने गंभीर इजा झाली होती.
मात्र, त्यानंतरही येथील जनावरे बांधण्याची जागा बदललेली नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त होत असून, ग्रामपंचायत एखाद्या विद्यार्थ्याचा बळी जाण्याचीच वाट पाहत आहे की काय? असा संतप्त सवालही नागरिकांमधून व्यक्त होत आहे.