कोल्हापुरात एका हॉस्पिटलमधून मृतदेहावरील दागिने लंपास, नातेवाईकांची तक्रार
By उद्धव गोडसे | Published: April 2, 2024 01:56 PM2024-04-02T13:56:52+5:302024-04-02T13:57:46+5:30
कोल्हापूर : रंकाळा परिसरातील एका हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेच्या हातातील दोन तोळे वजनाचा सोन्याचा गोठ अज्ञाताने लंपास केला. ...
कोल्हापूर : रंकाळा परिसरातील एका हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेच्या हातातील दोन तोळे वजनाचा सोन्याचा गोठ अज्ञाताने लंपास केला. याबाबत अजित सूर्याजी पाटील (वय ५४, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) यांनी सोमवारी (दि. १) जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील यांच्या आई शालन सूर्याजी पाटील यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यावेळी त्यांच्या अंगावर सोन्याची कर्णफुले, पाटल्या, वेल आणि गोठ होते. डावा हात सुजल्याने नातेवाईकांना त्यांच्या हातातील दोन तोळे वजनाचा गोठ काढता आला नाही. उर्वरित सर्व दागिने उपचारादरम्यान काढून घेतले. प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह ताब्यात घेताना फिर्यादी पाटील यांना आईच्या हातातील सोन्याचा गोठ दिसला नाही.
याबाबत त्यांनी हॉस्पिटलमधील कर्मचा-यांकडे विचारणा केली. मात्र, त्यांच्याकडून योग्य उत्तर मिळाले नाही. वारंवार विचारणा करूनही एक लाख २० हजार रुपये किमतीचा गोठ मिळत नसल्याने त्यांनी अखेर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत हॉस्पिटलमधील कर्मचा-यांची चौकशी केली जाईल, अशी माहिती जुना राजवाडा पोलिसांनी दिली.