Kolhapur: कोल्हापुरात महिलेच्या गळ्यातील सव्वा तीन लाखांचे दागिने हिसकावले
By संदीप आडनाईक | Updated: April 21, 2025 10:40 IST2025-04-21T10:40:34+5:302025-04-21T10:40:59+5:30
Kolhapur Crime: महिलेच्या गळ्यातील सव्वा तीन लाख रुपयांचे दागिने हिसकावून दोन चोरटे पसार झाल्याची घटना रविवारी घडली. .

Kolhapur: कोल्हापुरात महिलेच्या गळ्यातील सव्वा तीन लाखांचे दागिने हिसकावले
संदीप आडनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : चालत घरी जाताना राजारामपुरीत सातव्या गल्लीत सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घड्याळाच्या दुकानासमोर एका महिलेच्या गळ्यातील सव्वा तीन लाख रुपयांचे दागिने हिसकावून दोन चोरटे पसार झाल्याची घटना रविवारी घडली. .
याप्रकरणी शोभा सर्जेराव पाटील (वय ४८ रा. ट्युलिप बर्डस अपार्टमेंट, फ्लॅट नं २, राजारामपुरी सातवी गल्ली) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्या घरी चालत जात होत्या. राजारामपुरीतील सातव्या गल्लीतील हेलिओस घड्याळ्याच्या दुकानासमोर सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांच्या सुमारास मोटरसायकलवरुन आलेल्या अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील दोन व्यक्तींपैकी पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने महिलेच्या गळ्यात हात घालून २ लाख ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मणीमंगळसूत्र, फुलाचे डिझाईनच्या साखळीतील काळे मणी आणि सोन्याचा पदक असलेले ४० ग्रॅम वजनाचे जुवाकिस असे एकुण ३ लाख ३० हजार रुपयांचे दागिने हिसकावून घेतले.
या महिलेने आरडाओरडा केला, परंतु महिलेला धक्का देऊन चोरटे भरधाव वेगात पसार झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके, राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलिस निरिक्षक भरत साळुंखे यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलिस निरिक्षक दत्तात्रय भोजणे अधिक तपास करीत आहेत. पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात कलम ३०९ (४), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.