वारणानगर रोकड चोरी प्रकरणी झुुंजार सरनोबत यांच्यावरही खटले
By admin | Published: May 11, 2017 06:26 PM2017-05-11T18:26:38+5:302017-05-11T18:26:38+5:30
घनवटसह कांबळेच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ११ : कोल्हापूर जिल्हयातील वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीतील चोरी प्रकरणी फिर्याद दाखल केलेले बांधकाम व्यावसायिक झुंजार सरनोबत यांच्यावर दिवाणी व फौजदारी स्वरुपाचे २० प्रलंबित व निकाली न्यायालयात खटले दाखल असल्याचा युक्तिवाद आरोपीचे वकील व सातारा येथील अॅड.आर.के.धायगुडे यांनी गुरुवारी केला.
जिल्हा न्यायालयातील तदर्थ जिल्हा न्यायाधीश क्रमांक दोन एस.एम.कोचे यांच्या न्यायालयात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निलंबित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट व कॉन्स्टेबल कुलदीप कांबळे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुमारे दोन तास अशंत: सुनावणी झाली. याची पुढील सुनावणी सोमवारी (दि. १५) होणार आहे.संशयित आरोपी घनवट व कांबळे यांच्यावतीने सातारा येथील अॅड. आर.के.धायगुडे यांनी युक्तिवाद केला. यावेळी जिल्हा सरकारी वकील अॅड. विवेक शुक्ल उपस्थित होते.
वारणानगर येथील शिक्षक कॉलनीतील खोलीमधील चोरी प्रकरणी पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहाय्यक निरीक्षक सूरज चंदनशिवे यांच्यासह सात जणांवर कोडोली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी संशयित घनवट व कुलदीप कांबळे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. यापुर्वी या प्रकरणातीलचार पोलिसांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
यावेळी अॅड. आर. के. धायगुडे यांनी, वारणानगर चोरीतील फिर्यादी झुंजार सरनोबत यांच्याविरोधातत दिवाणी व फौजदारी स्वरुपाचे सुमारे २० न्यायालयीन प्रकरणे (खटले) आहेत. त्यामुळे त्यांना कायद्याची चांगली जाण आहे. या शिक्षक कॉलनीत त्यांनी ठेवलेले पैसे हे सशंयास्पद आहे. या खोलीशेजारी एका संस्थेची रेकॉर्ड रुम आहे. त्यांचा हा केवळ दिखावा आहे. ते तपास यंत्रणेची दिशाभूल करीत आहेत. त्यांनी २०१६-१७ या आर्थिक वर्षाचा प्राप्तिकर ५० लाख रुपये प्राप्तिकर विभागाला भरणा केला आहे. त्यांनी जमीन खरेदीचा बनाव केला आहे. तसेच सुमारे १४ कोटी रुपयांच्या रक्कमेचा कोणताही पुरावा त्यांनी दिलेला नाही.
प्राप्तिकर विभागाला त्यांनी ३ ते ४ कोटी रुपयांचा खुलासा केला आहे व तेवढ्याच रकमेचा आयकर भरला आहे. तसेच कोडोली पोलिसांनी केलेले चार्जशीट (दोषारोपपत्र) मध्ये जप्त केलेल्या रकमेचा व ही रक्कम कोठून आली याचा खुलासा नाही आहे. याचा तपास तत्कालीन शाहूवाडी पोलिस विभागाचे पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी केला. सरनोबत यांचे नातेवाईक,नातेवाईकांचा मुलगा यांचा जबाब नोंदविला आहे. सुमारे चार कोटी ६४ लाख रुपये रक्कम जप्त केल्याचा उल्लेख दोषारोपपत्रात केला आहे.
या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मैनुद्दीन मुल्ला याचा मित्र विनायक जाधव याच्याकडून ६९ लाख रुपये घेऊन त्यातील ६८ लाख रुपये मैनुद्दीनने स्वत: जवळ ठेवून तो पसार झाला. ३१ मे २०१६ ला सरनोबत यांचा पुरवणी जबाब झाला. सरनोबत यांनी ही रक्कम परत मिळण्यासाठी पन्हाळा न्यायालयात अर्ज केला होता. तेव्हा संशयित आरोपी मैनुद्दीन मुल्ला याने ही रक्कम सरनोबत यांची नाही आहे. ही रक्कम मुंबई येथील गुन्ह्यातील आहे.त्याच्यावर मुंबईतील सात कोटी रुपयांचा आरोप आहे. तसेच मिरज बेथलहेमनगर येथे सापडलेली मैनुद्दीन मुल्लाच्या मेहूणीच्या घरात सापडलेली सुमारे तीन कोटी रुपयांची रक्कम ही चिकोडी येथील कॉलेज समोरुन लावलेल्या एका कारमधून त्याचा मित्र रेहान अन्सारी या दोघांनी चोरीस केली होती. यावरुन सरनोबत हे पोलिस , प्राप्तिकर विभाग यांची दिशाभूल करीत असल्याचा युक्तिवाद अॅड.आर.के.धायगुडे यांनी केला. धायगुडे यांना अॅड. अजित सावंत यांनी सहकार्य केले.