‘झूम’च्या दुर्गंधीने गुदमरतोय ‘श्वास’

By admin | Published: March 3, 2015 12:19 AM2015-03-03T00:19:10+5:302015-03-03T00:29:58+5:30

कचरा प्रकल्पाने त्रस्थ : बहुतांश सार्वजनिक शौचालये बंद; हॉकी मैदानावरील धुरळ््याचा त्रास

'Jhum' suffers from bad breath 'breath' | ‘झूम’च्या दुर्गंधीने गुदमरतोय ‘श्वास’

‘झूम’च्या दुर्गंधीने गुदमरतोय ‘श्वास’

Next

शासकीय कर्मचारी, अधिकारी आणि पोलिसांची निवासस्थाने असलेला प्रभाग म्हणून क्र. ६ ‘लाईन बझार’ ओळखला जातो. प्रभागात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरणारा ‘झूम’ कचरा प्रकल्प तसेच नियमित होणारी कचऱ्याच्या गाड्यांची वाहतूक यामुळे स्थानिक नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. झूमचा ‘वास’ आणि घेता येईना ‘श्वास’ अशी अवस्था इथल्या नागरिकांची झाली आहे. एकवेळ विकासकामे कमी करा; परंतु झूम हटवा, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे.
श्री कॉलनी, मराठा कॉलनी, साईनाथ कॉलनी, त्र्यंबोलीनगर, रेणुकानगर अशा उपनगरातील मोठ्या कॉलन्यांसह ‘झूम’ प्रकल्पाशेजारील अष्टेकर नगर, जाधव पार्क,
निवास रेसिडेन्सी, आदी कॉलनींसह मूळ लाईन बझार गावठाण हद्द त्याचबरोबर नवीन पोलीस लाईन, अंडी उबवणी केंद्र, शेती फार्म, सेवा रुग्णालय, भगवा चौकातील साठ कोठरी पोलीस लाईनपर्यंत असा मोठ्या भौगोलिक रचनेत हा प्रभाग विखुरला आहे.
प्रभागाचा मोठा विस्तार असल्याने काही ठिकाणी रस्ते, गटारीची कामे करणाऱ्यावर मर्यादा आल्या आहेत. प्रभागात पाण्याची सोय चांगली आहे. रस्त्यावरील दिवे, रस्तेही अनेक ठिकाणी चांगले आहेत.
प्रभागाची सहा हजार ६५६ इतकी लोकसंख्या आहेत; परंतु नवीन विकसित होत असलेल्या कॉलन्यामुळे प्रभागाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. प्रामुख्याने शासकीय कर्मचारी, अधिकारी आणि पोलिसांची तसेच बाहेरून आलेल्या लोकांनी येथे प्लॉट घेऊन बांधकाम करून स्थायिक झालेल्या उच्च मध्यमवर्ग, मध्यमवर्ग लोकांचा या प्रभागात समावेश आहे. मात्र, तरीही मूळ गावठाणात राहणाऱ्यांमध्ये शेतकरी कुटुबांचाच समावेश आहे.
प्रभागाच्या पूर्वेकडील अष्टेकरनगर, जाधवपार्क, अयोध्या कॉलनी, राजगड कॉलनी, मूळ
लाईन बझार हा सर्व परिसर झूम प्रकल्पाच्या जवळच येत असल्याने येथील नागरिकांना त्याचा खूप त्रास होतो. झूम सतत पेटलेला असतो. त्यामुळे त्याचा धूर वाऱ्याची
दिशा बदलेल तसा पसरतो. दिवसभरात या प्रकल्पाकडे कचरा घेऊन येणाऱ्या गाड्यांच्या वासाने नागरिक हैराण आहेत.
या प्रभागात असलेल्या कामगार चाळीजवळील २१ सार्वजनिक शौचालयापैकी आता केवळ पाच शौचालये सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांची कुचंबणा होत असल्याच्या तक्रारी आहेत. प्रभागात असणाऱ्या हॉकी मैदानाचा धुरळा या मैदानाशेजारील घरात खूप येतो. प्रत्येक घरात मोठ्या प्रमाणात धुरळा येत असल्याने नागरिक हैराण आहेत. मैदानाचा वापर करण्यापूर्वी दररोज पाण्याचा मारा मैदानावर व्हावा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. प्रभागातील भेडसावणारी आणखी एक समस्या म्हणजे काळवट जमीन. काळवट जमिनीमुळे काही ठिकाणी घरे आरली आहेत. त्यामुळे गटारी उंच आणि घरे सखल भागात गेली
आहेत. त्यामुळे सांडपाण्याची निर्गत व्यवस्था काही ठिकाणी होत नसल्याचे चित्र आहे.

प्रभागाचा विस्तार मोठा असल़्याने कामे करताना निधीअभावी अडचणी येतात. तरीही आतापर्यंत तीन कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. चार नंबर फाटक ते लाईन बझार, बस स्टॉप ते भगवा चौक हा नगरोत्थानमधील रखडलेला रस्ता लवकरच पूर्ण होईल. हनुमान मंदिर बालोद्यानमध्ये लहान मुलांसाठी खेळणी बसविली तसेच वृक्षारोपण करून आॅक्सिजन पार्क केले. संपूर्ण प्रभागात दररोज दोन तास पाण्याचे नियोजन केले. प्रभागात गटर्स व डांबरीकरणाची कामे केली. जी काही अपुरी कामे आहेत, ती पुढील सहा महिन्यांत मार्गी लावण्यात येणार आहेत.
- चंद्रकांत गणपती घाटगे,
नगरसेवक

Web Title: 'Jhum' suffers from bad breath 'breath'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.