ग्रामपंचायत अर्ज भरण्यासाठी उद्यापासून झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:18 AM2020-12-27T04:18:51+5:302020-12-27T04:18:51+5:30
ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज सोबत विविध दाखले जोडावे लागत असल्याने इच्छुकांची दमछाक उडत आहे. त्यातच बिनविरोधसाठी ...
ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज सोबत विविध दाखले जोडावे लागत असल्याने इच्छुकांची दमछाक उडत आहे. त्यातच बिनविरोधसाठी स्थानिक पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू असल्याने इच्छुकांचीही कोंडी झाली आहे. त्यामुळेच पहिल्या दोन दिवसांत तुरळक अर्ज दाखल झाले. त्यानंतर शुक्रवारी (दि. २५) नाताळची सुट्टी, तर शनिवार व रविवारी कार्यालये बंद असल्याने थेट उद्याच अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळेच इच्छुकांची झुंबड उडणार आहे. गेली दोन दिवस इच्छुक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात गुंग आहेत, तर स्थानिक नेते जोडण्या लावण्यात गुंतले आहेत. कोणत्या प्रभागातून कोणाला उभे करायचे? भावकीची एकगठ्ठा मते कोण घेऊ शकते? तरुण मंडळे कोणाच्या मागे राहतील, याचे आडाखे बांधून उमेदवारीची चाचपणी सुरू आहे.
उमेदवारी अर्जासोबत माघारी
ज्या प्रभागात एकापेक्षा अधिक इच्छुक आहेत, तिथे त्रांगडे निर्माण झाले आहे. त्यामुळे स्थानिक नेते उमेदवारी अर्जासोबत माघारीवर स्वाक्षरी करून घेत आहेत.
- राजाराम लाेंढे