वीस रुपयांत ‘झुणका-भाकरी’
By admin | Published: June 19, 2014 01:12 AM2014-06-19T01:12:32+5:302014-06-19T01:13:21+5:30
शेतकरी सहकारी संघ सेवक संस्था : भवानी मंडपात भाविकांची गर्दी
राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर
करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणारे भाविक व परगावांहून येणाऱ्यांसाठी अगदी माफक दरात झुणका-भाकरी मिळणार आहे. सामाजिक जाणिवेतून शेतकरी सहकारी संघ सेवक संस्थेच्यावतीने भवानी मंडपात हा उपक्रम सुरू केला असून, वीस रुपयांत पोटभर जेवण मिळत असल्याने भाविकांसह नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शेतकरी संघ म्हटले की, विश्वासाचे नातेच समोर येते. संपूर्ण आशिया खंडात नावाजलेल्या संघाचे नाते अजूनही सामान्य माणसांमध्ये घट्ट आहे. मध्यंतरीच्या काळात संघाची आर्थिक घडी थोडी विसकटली होती; पण संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून संघाची वाटचाल पूर्व वैभवाकडे सुरू आहे. शेतकरी संघाची वाटचाल ही सामाजिक बांधीलकीतून सुरू आहे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत शेतकरी संघाच्या सेवक संस्थेने वाटचाल सुरू केली आहे.
अंबाबाईच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक विविध ठिकाणांहून येतात. मंगळवार, रविवार, शुक्रवार या दिवशी तर भाविकांची संख्या वाढते. येथे सर्वसामान्य भाविकांची संख्याही लक्षणीय असते. अक्कलकोट, शिर्डी, आदी ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी मोफत अन्नछत्राची सोय केलेली आहे. येथेही मोफत अन्नछत्राची सोय
आहे.
अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना माफक दरात जेवण देण्याचा प्रयत्न शेतकरी संघ सेवक संस्थेने केला आहे. शेतकरी संघाच्या भवानी मंडप येथील संस्थेच्या कार्यालयात भाविकांसाठी ही सोय केलेली आहे.
वीस रुपयांत दोन भाकरी, दोन वाटी झुणका, खर्डा, कांदा, पापड, आदी भाविकांसह इतरांनाही अशा प्रकारचे जेवण मिळणार आहे.
आज आपण कोल्हापूर शहरात मिसळ खायची म्हटले, तर ३५-४० रुपये मोजावे लागतात. वडापाव पंधरा रुपयांना मिळतो. त्याच्या तुलनेत झुणका-भाकरी फारच स्वस्त आहे. या परिसरातच एक भाकरी, भाजी तीस रुपयांना मिळते. पण, येथे दोन भाकरी, भाजी, पापड, खर्डा अवघ्या वीस रुपयांत मिळत असल्याने भाविक व येथे येणाऱ्या नागरिकांची गर्दी होत आहे.