बेळगावच्या मराठा इन्फंट्रीत घडताहेत जिगरबाज कमांडो
By admin | Published: March 4, 2017 01:17 AM2017-03-04T01:17:39+5:302017-03-04T01:17:39+5:30
खडतर प्रशिक्षण : अधिकाऱ्यांनी उलगडला गौरवशाली इतिहास
बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर आणि कमांडो विंगला माध्यमांच्या प्रतिनिधींनी भेट देऊन कमांडो आणि जवानांना दिल्या जाणाऱ्या खडतर प्रशिक्षणाची माहिती घेतली. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर प्रवीण शिंदे आणि कमांडो विंगच्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणाची माहिती देऊन मराठ्यांचा गौरवशाली इतिहास सांगितला.
रिक्रूट म्हणून दाखल झालेल्या तरुणांना खडतर प्रशिक्षण देऊन परिपूर्ण सैनिक बनविण्याचे कार्य मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये केले जाते. तर ज्युनियर लीडर्स विंगच्या कमांडो विंग येथे मृत्यूवर मात करणाऱ्या कमांडोंचे प्रशिक्षण दिले जाते. जवान आणि कमांडो याना कशा पद्धतीचे कठीण प्रशिक्षण दिले जाते आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची देशसेवेसाठी केली जाणारी नियुक्ती याची माहिती जनतेला प्रसार माध्यमाद्वारे मिळावी म्हणून माध्यम प्रतिनिधींना मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर आणि कमांडो विंग येथे निमंत्रित करण्यात आले होते.
कमांडो विंगमध्ये साप हाताळणे, गोळीबार, अतिरेक्यांविरुद्ध कारवाई, शस्त्रास्त्रे, दारूगोळा हाताळणे, शत्रूच्या नजरेला न पडता आपले लक्ष्य साध्य करून सुखरूप परतणे, आदी कमांडोना दिले जाणारे प्रशिक्षण दाखविण्यात आले. मराठा सेंटरमध्ये ड्रिल, शस्त्रास्त्र हाताळणे, हेलिकॉप्टरमधून उतरून शत्रूच्या प्रदेशात कारवाई करून परत येणे, तसेच गोळीबार याबरोबरच तंदुरुस्तीसाठी दिले जाणारे एरोबिक्स, मल्लखांब यांची प्रात्यक्षिके मराठाच्या जवानांनी माध्यम प्रतिनिधीसमोर सादर केली.
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे अधिकारी, प्रशिक्षक, कमांडो विंगचे अधिकारी, प्रशिक्षक यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती दिली. (प्रतिनिधी)
सर्जिकल स्ट्राईक काय असते?
हे जनतेने गेल्या काही दिवसांत ऐकल आहे. मात्र, शुक्रवारी ज्युनिअर लीडर्स विंगच्या कमांडोनी शत्रूच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक कशी केली जाते, याचे प्रात्यक्षिक दाखविले. पाकव्याप्त काश्मीरमधील सर्जिकल कारवाईत बेळगावमधील २१ पारा कमांडोनी सहभाग दर्शविला होता. देशातील सर्वांत ख्यातनाम असलेली घातक प्लाटून इथेच प्रशिक्षित केली जाते. ज्युनिअर लीडर्स विंग हे देशातील एकमेव कमांडो ट्रेनिंग सेंटर आहे. जिथे सर्व कमांडोंना प्रशिक्षण दिले जाते.