लोककला केंद्रास जिजाऊंचे नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 01:48 AM2019-06-18T01:48:13+5:302019-06-18T01:49:42+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील लोककला केंद्रास ‘राष्ट्रमाता जिजाऊ’ यांचे नाव तत्काळ द्यावे, अशी प्रलंबित मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या ...
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील लोककला केंद्रास ‘राष्ट्रमाता जिजाऊ’ यांचे नाव तत्काळ द्यावे, अशी प्रलंबित मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला आघाडीने सोमवारी सकाळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या मागणीची दखल घेत सायंकाळी विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने लोककला केंद्रास ‘राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृह’ असे नामकरण करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने विद्यापीठ विभूषित झालेय, या विद्यापीठात राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या स्मृती जतन व्हाव्यात यासाठी विद्यापीठातील दीक्षान्त समारंभाच्या लोककला केंद्रास ‘राष्ट्रमाता जिजाऊ’ यांचे नाव द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे गेल्या तीन वर्षांपासून केली जात आहे. या मागणीची दखल घेऊन विद्यापीठाच्या अधिसभा, विशेष समिती आणि व्यवस्थापन समितीमध्ये लोककला केंद्रास राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव देण्यास मंजुरी मिळाली आहे; मात्र विद्यापीठ प्रशासनाकडून अद्याप लोककला केंद्रास राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात आले नव्हते.
राजमाता जिजाऊ स्मृतिदिनानिमित्त सोमवारी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला आघाडीकडून लोककला केंद्रास ‘राष्ट्रमाता जिजाऊ’ यांचे नाव तत्काळ देऊन अंमलबजावणी करावी, अशी मागणी कुलगुरूडॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे केली. यावेळी महिला आघाडीच्या वतीने मागणीचे निवेदन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना दिले. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी लोककला केंद्रास राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव देण्याची कार्यवाही तत्काळ करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
याप्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शैलजा भोसले, उषा लोंढे, तेजस्विनी नलवडे, बिना देशमुख, नेहा मुळीक, अश्विनी पाटील, संजीवनी चौगुले, वृषाली चव्हाण, उज्ज्वला जाधव यांच्यासह महिला आघाडीच्या कार्यकर्त्या महिला उपस्थित होत्या.
महासंघातर्फे आनंदोत्सव ...
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आंदोलनाची दखल घेऊन सोमवारी सायंकाळी तत्काळ सभागृहाचे नामकरण करण्यात आले. नामकरण होताच महासंघाच्या वतीने तत्काळ सभागृहाबाहेर साखर, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, युवा शहराध्यक्ष अवधूत पाटील, शंकरराव शेळके, सुनील पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीक्षान्त सभागृहास ‘राष्ट्रमाता जिजाऊ’ असे नामकरण करण्यात यावे, ही मागणी आम्ही लोकशाही मार्गाने गेली कित्येक वर्षांपासून करत आहे. आज जिजाऊ यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने नामकरण करण्यात आले; त्यामुळे जिजाऊ माँसाहेब यांच्या स्मृती व प्रेरणा विद्यार्थ्यांना यापुढे मिळणार आहेत. यांचा आम्हाला आनंद होत आहे.
- वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ