जिलेबी, मिठाई वाटपावर निर्बंध येण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 04:31 PM2020-08-13T16:31:59+5:302020-08-13T16:35:02+5:30
स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्टला सार्वजनिकरीत्या केल्या जाणाऱ्या जिलेबी अथवा तत्सम मिठाई वाटपावर निर्बंध येण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर : स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्टला सार्वजनिकरीत्या केल्या जाणाऱ्या जिलेबी अथवा तत्सम मिठाई वाटपावर निर्बंध येण्याची शक्यता आहे.
सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी तसा आदेश काढल्याने कोल्हापूरचे जिल्हा प्रशासन काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. ठिकठिकाणी मांडलेल्या स्टॉल्सवर तसेच सार्वजनिकरीत्या मिठाई वाटप केल्यास कोरोना संसर्ग होण्याचा धोका असल्याने यंदा हे वाटप केले जाऊ नये अशी मागणी होत आहे.
यंदा कोरोना संसर्गाचा धोका असल्याने सातारा जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सार्वजनिकरीत्या जिलेबीसह मिठाई तयार करता येणार नाही व तिचे वाटप करता येणार नाही असा आदेश काढला आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार याबद्दल उत्सुकता आहे.
स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाला शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी, चौकाचौकांत जिलेबी, गुलाबजामसह मिठाईचे स्टॉल लावले जातात. त्यासाठी आदल्या दिवसापासूनच मांडव उभारले जातात. येथे मिठाई खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी असते.
ध्वजवंदन झाले की सार्वजनिकरीत्या या मिठाईचे वाटप करण्याची पद्धत आहे. शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक व खासगी संस्थांच्या वतीने हे वाटप केले जाते. सध्या शाळा महाविद्यालये बंद असल्याने वाटपाचे प्रमाण होणार असले तरी संसर्गाचा धोका आहेच; त्यामुळे काही मंडळांनी व संस्थांनी स्वत:हून पुढाकार घेऊन मिठाईचे सार्वजनिकरीत्या वाटप न करण्याचा निर्णय घेतला आहे.
-