'जो पेन्शन पे बात करेगा वो देश पे राज करेगा', कोल्हापुरात भव्य रॅलीतून कर्मचाऱ्यांचा शासनाला इशारा
By इंदुमती सूर्यवंशी | Published: March 14, 2023 04:35 PM2023-03-14T16:35:43+5:302023-03-14T16:42:00+5:30
संप काळात रोज सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत कर्मचारी टाऊन हॉलमध्ये जमणार आहेत
कोल्हापूर : जो पेन्शन पे बात करेगा वो देशपे राज करेगा, एकच मिशन जुनी पेन्शन, पीएफआरडीए बिल रद्द करा, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही... अशा घोषणा देत व भव्य रॅलीतून शासनाला इशारा देत आज, मंगळवारपासून जिल्ह्यातील सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी एल्गार पुकारला. शासनाला काय कारवाई करायची ती करू दे पण आता जुनी पेन्शन पदरात पाडून घेऊनच कामावर हजर होणार असा निर्धार करत जिल्ह्यातील ८० हजार कर्मचारी, शिक्षक संपात सहभागी झाले.
सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी, राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करावी यासह आठ मागण्यांसाठी कर्मचारी व शिक्षकांनी मंगळवारपासून बेमुदत संपाचे अस्त्र उगारले. सकाळी साडे दहा वाजल्यापासून कर्मचारी व शिक्षक टाऊन हॉल बागेत जमत होते. येथे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे निमंत्रक अनिल लवेकर म्हणाले, शासनाने आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करतो एवढे एक वाक्य म्हणावे आम्ही लगेच संप मागे घेतो. शासनाने केंद्राकडे पीएफआरडीए बिलातून महाराष्ट्राला वगळण्याची विनंती करावी.
शैक्षणिक व्यासपीठचे एस. डी. लाड यांनी नवे शैक्षणिक धोरण रद्द करा व अशैक्षणिक कामे लावू नका अशी मागणी केली. शिक्षक परिषदेचे अध्यक्ष दादा लाड यांनी कारवाईची भीती बाळगू नका, संप यशस्वी करा असे आवाहन केले. यासह माध्यमिक शिक्षक संघाचे राजेश वरक, खाजगी प्राथमिक शिक्षक समितीचे भरत रसाळे, प्राथमिक शिक्षक समितीचे सुधाकर सावंत, अतुल दिघे, दिलीप पोवार यांनी मनोगत व्यक्त केले.
दुपारी सव्वा बारा वाजता रॅलीला सुरुवात झाली. जुनी पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, एकच मिशन जुनी पेन्शन, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा देत आणि हातात फलक घेऊन कर्मचारी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी रॅलीत सहभागी झाले. यात पुरुषांबरोबरच महिलांची संख्याही प्रचंड होती. सर्वांनी डोक्यावर एकच मिशन जुनी पेन्शन लिहिलेल्या पांढऱ्या टोप्या घातल्या होत्या.
टाऊन हॉल, शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी रोडमार्गे बिंदू चौक, आईसाहेब महाराज पुतळा, दसरा चौक, सीपीआर हॉस्पिटल चौक ते पुन्हा टाऊन हॉल येथे रॅलीचा समारोप झाला. संपा दरम्यान रोज सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत कर्मचारी टाऊन हॉलमध्ये जमणार आहेत.