कठड्याचे काम सुरू
By admin | Published: June 26, 2016 12:51 AM2016-06-26T00:51:20+5:302016-06-26T00:51:20+5:30
शिवाजी पूल : दुरूस्तीचे काम आज सायंकाळपर्यंत पूर्ण होणार
कोल्हापूर : कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाच्या कोसळलेल्या कठड्याच्या दुरुस्तीच्या कामास शनिवारपासून सुरुवात झाली. कोणताही धोका पोहोचू नये यासाठी रस्त्याच्या बाजूला लोखंडी बॅरेकेटस् लावण्यात आले आहेत. हा पूल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात या प्रशासनाच्या अखत्यारित येतो.
शिवाजी पुलाचा कठडा शुक्रवारी (दि. २४) कोसळल्याचे उघडकीस आले. हा कठडा अवजड वाहनाची धडक लागल्याने पडल्याची शक्यता नागरिक यावेळी व्यक्त करीत होते. हा प्रकार समजताच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातच्या (२०४ ) प्रशासनातील अधिकाऱ्यांनी याठिकाणी भेट दिली. अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना तातडीने काम करण्याच्या सूचना दिल्या. या मार्गावरील वाहनांची वर्दळ लक्षात घेता रात्री वाहतूक शाखेने लोखंडी बॅरेकेटस लावली. त्यानुसार शनिवारी सिमेंट क्राँक्रिटच्या साहाय्याने दगड जोडण्याचे काम सुरू होते. याबाबत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातचे कार्यकारी अभियंता आर. के. बामणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शिवाजी पुलाच्या कठड्याचे दुरुस्तीचे काम गतीने सुरू आहे. आज, रविवारी सायंकाळपर्यंत पूर्ण होईल.
दरम्यान, कोल्हापूर-रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात (२०४) आहे. विशेष म्हणजे दररोज या पुलावरून कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दिवस-रात्र वाहनांची वर्दळ असते. १२५ वर्षे या पुलाला होऊन गेली आहेत. पुलाच्या डाव्या बाजूला एखाद्या अवजड वाहनाने कठड्याला मोठ्या प्रमाणात धडक मारली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कठड्याचे १५ ते २० मोठे दगड निखळून खाली पडले आहेत. तसेच तेथील रस्ताही खचला आहे.