विद्यापीठात नोकरीचे आमिष; लाखोंचा गंडादोघांना अटक
By admin | Published: August 28, 2016 12:41 AM2016-08-28T00:41:02+5:302016-08-28T00:41:02+5:30
दोघे पसार : भामटे पन्हाळ्यातील
कोल्हापूर : मंत्रालयात मेहुणा सचिव असल्याचे सांगून शिवाजी विद्यापीठात वरिष्ठ लिपिक पदावर नोकरीचे आमिष दाखवून चौघाजणांच्या टोळीने अकरा तरुणांना ३३ लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी शनिवारी संशयित भामटे बजरंग हिंदुराव घाटगे (वय ३०, रा. पोर्ले, ता. पन्हाळा), जयदीप आनंदराव निकम (२७, रा. निकमवाडी, ता. पन्हाळा) यांना अटक केली. मुख्य सूत्रधार नितीन वसंत कदम (रा. आसुर्ले पोर्ले, ता. पन्हाळा) व रोहित यादव (गुजरी कॉर्नर) हे पसार आहेत. या प्रकाराने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी, संशयित नितीन कदम याने आत्माराम दादू मोटे (४७, रा. कुशिरे पोहाळे, ता. पन्हाळा) यांना व इतर अकरा तरुणांच्या पालकांना आपले नाव दिगंबर वसंत साळुंखे (रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) असल्याचे सांगितले. आपला मेहुणा मंत्रालयात सचिव असून त्याच्यामार्फत शिवाजी विद्यापीठात कुलगुरूंना पैसे देऊन लिपिक पदावर नोकरीची आॅर्डर देतो, असे त्याने भासविले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत आत्माराम मोटे यांनी मुलगा सूरज याला नोकरी लावण्यासाठी त्याला तीन लाख रुपये दिले. त्यानंतर संशयित कदमसह रोहित यादव, बजरंग घाटगे, जयदीप निकम यांनी संगनमताने विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात वरिष्ठ लिपिक पदावर नियुक्तीची कार्यालयीन आदेशाची प्रत सूरजला दिली. त्यानंतर किरण रामचंद्र कुरणे याच्यासह अकरा तरुणांना नियुक्ती आदेशाची प्रत दिली. त्यासाठी त्यांच्याकडून प्रत्येक तीन लाख रुपये घेतले.
विद्यापीठ आवारात व्यवहार
संशयितांनी नोकरीचे आमिष दाखवून तरुणांच्या पालकांना विद्यापीठ आवारात बोलावून चर्चा केली होती. त्यामुळे पालकांचा व तरुणांचा त्यांच्यावर विश्वास बसला. पैशाचे व्यवहारही त्यांनी विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृह परिसर व सायबर चौकात केले. फसवणूक झालेल्या तरुणांची घरची परिस्थिती बेताची आहे. कर्ज काढून त्यांनी मुलांच्या भविष्याचा विचार करून पैसे दिले आहेत.
विद्यापीठ प्रशासनही संशयाच्या भोवऱ्यात
शिवाजी विद्यापीठाच्या प्रशासनाचा शिक्का व सचिवांच्या सहीचा वापर झाल्याने प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यामध्ये हात असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिसही त्या दृष्ठीने तपास करीत आहेत. संशयितांची विद्यापीठात कोणाकडे ऊठबस असते, त्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
नितीन कदम राजकीय भामटा
संशयित भामटा नितीन कदम याने आसुर्ले पोर्ले ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली होती. त्याची राजकीय पुढाऱ्यांसोबत ऊठबस असते. त्याच्याच जोरावर तो लोकांना गंडा घालीत असल्याची चर्चा आहे. त्याचे अन्य साथीदार स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरवीत असतात.
असा झाला उलगडा...
नियुक्ती आदेशावर विद्यापीठ प्रशासनाचा शिक्का, कार्यालयीन आदेश क्रमांक ४१६, सन २०१६ कुलगुरू यांचा आदेश क्रमांक ११४, जावक क्रमांक : को. बा. म./परी-३/४०३/दि. ६ जून २०१६ व सचिवांची सही पाहून तरुण भारावून गेले.
नियुक्ती आदेश घेऊन हे सर्वजण विद्यापीठ प्रशासनाकडे हजर होण्यासाठी गेले असता लिपिक पदासाठी कोणतेच आदेश निघाले नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यांनी सोबत आणलेले आदेश दाखविले असता विद्यापीठ प्रशासनाने ते बोगस असल्याचे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कदम यांच्यासह अकरा तरुणांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
विद्यापीठात अशी कोणतीही भरती परस्पर केली जात नाही. रीतसर जाहिरात देऊन व प्रक्रिया पार पाडून कुलसचिव आदेश काढत असतात. लोकांनी अशा भूलथापांना बळी पडू नये.
- डॉ. व्ही. एन. शिंदे, प्रभारी कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ
------------------------------------------