वारसांना थेट व्हॉट्सॲपवर नोकरीची ऑर्डर, आयुक्तांचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 11:20 AM2020-07-01T11:20:26+5:302020-07-01T11:22:47+5:30
सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर वारसाना थेट व्हॉट्सॲपवर ऑर्डर देण्यात येणार असल्याचा निर्णय आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी घेतला. झाडू कामगारांच्या मुलाकडून वारसाच्या नोकरीची ऑर्डर देण्यासाठी ७० हजारांची मागणी होत असल्याच्या प्रकरणाची साहाय्यक आयुक्त अवधूत कुंभार यांना चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले.
कोल्हापूर : सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर वारसाना थेट व्हॉट्सॲपवर ऑर्डर देण्यात येणार असल्याचा निर्णय आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी घेतला. झाडू कामगारांच्या मुलाकडून वारसाच्या नोकरीची ऑर्डर देण्यासाठी ७० हजारांची मागणी होत असल्याच्या प्रकरणाची साहाय्यक आयुक्त अवधूत कुंभार यांना चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले.
वारसाला नोकरी पाहिजे असल्यास ७० हजार रुपये द्या, असे वृत्त लोकमतने मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. या वृत्ताने महापालिकेमध्ये खळबळ उडाली. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. वारसांनी नोकरीसाठी अशा प्रवृत्तीला बळी पडू नये म्हणून थेट व्हॉटसॲपवरच ऑर्डर देण्याचा निर्णय घेतला. अर्जावर आयुक्तांची सही झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुढील कागदपत्राची पूर्तता करण्यासंदर्भात यामध्ये संदेश दिला जाणार आहे. त्यामुळे कोणाला पैसे देण्याची गरजच भासणार नाही.
आयुक्त डॉ. कलशेट्टी यांची कर्मचारी संघटनेसोबत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी बैठक झाली. झाडू कामगारांच्या वारसांकडून नोकरीसाठी पैशाची मागणी होत असल्यास हे चुकीचे आहे. कष्टकरी लोकांबाबतच असा प्रकार होणे हे मनाला दु:ख देणारे असल्याचेही आयुक्तांनी बोलून दाखविले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी संघटनेशी कोणी संबंधित नाही. दोषींवर कारवाई केल्यास आमची कोणतीच तक्रार नसेल, असे स्पष्ट केले.
चौकट
कदमवाडी झोपडपट्टीतील झाडू कामगाराच्या मुलग्याचा अर्ज कोणत्या विभागात, कोणत्या अधिकाऱ्याकडे, किती दिवस प्रलंबित राहिला याची माहिती लेबर ऑफिस घेत आहे. याचा सविस्तर अहवाल साहाय्यक आयुक्त कुंभार यांना दिला जाणार आहे.
वारसाच्या नोकरीच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकपणा आणला जाणार आहे. पैशाची मागणी होत असल्याप्रकरणी साहाय्यक आयुक्त अवधूत कुंभार यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यामधील दोषींवर कारवाई केली जाईल.
डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी,
आयुक्त, महापालिका