२७९ जणांची रोजगार मेळाव्यात नोकरी ‘फिक्स’
By admin | Published: January 5, 2015 12:07 AM2015-01-05T00:07:38+5:302015-01-05T00:33:50+5:30
रिकाम्या हातांना मिळाले काम : १७ कंपन्यांचा सहभाग
कोल्हापूर : जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रातर्फे देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉमर्स कॉलेज येथे आज, रविवारी आयोजित रोजगार मेळाव्यातून २७९ रिकाम्या हातांना काम मिळाले. कोल्हापुरातील मानांकित अशा १७ आस्थापनांच्या व्यवस्थापकांना या मेळाव्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. एकूण ३८८ रिक्त पदांसाठी हा मेळावा झाला.
सकाळी दहा वाजल्यापासून या रोजगार मेळाव्यास सुरुवात झाली. बेरोजगार युवकांच्या गर्दीने परिसर गजबजून गेला होता. हायस्कूलच्या बाहेरील फलकांवर आस्थापनांची नावे, रिक्त पदाचे नाव, संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, तसेच खोली नंबर लावण्यात आले होते. त्याप्रमाणे उमेदवार आपल्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे मुलाखतीस जात होते. १८ ते ३५ वयोगटांतील उमेदवारांसाठी एकूण ३८८ जागांसाठी हा मेळावा झाला.
जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक बेरोजगारांनी या मेळाव्यास भेट दिली, तर अनेकांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी प्रत्यक्षात ३२७ तरुणांनी हजेरी लावली. रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन अधिकारी संजय माळी,
वसंत माळकर, कॉमर्स कॉलेजचे संग्रामसिंह रजपूत, आदी उपस्थित होते.
उदासीनता कायम
सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींचा शासकीय नोकरीच पाहिजे, असा अट्टहास असल्याने अनेकजण संधी असूनही खासगी नोकरीकडे पाठ फिरवत असल्याने बेरोजगारी वाढत आहे. खासगी कंपनीतही चांगला पैसा व प्रतिष्ठा मिळते. खासगी ठिकाणी नोकरी न करण्याची मानसिकता बेरोजगार युवकांची झाली आहे, असे काहीसे चित्र आजच्या रोजगार मेळाव्यांतून दिसून आले, कारण सुमारे ३८८ विविध पदांच्या रिक्त जागा असतानासुद्धा फक्त ३२७ उमेदवारांनीच मुलाखती दिल्या.
राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे यापैकी प्रत्येकाला शासकीय नोकरी मिळेलच, अशी शाश्वती नाही. कारण वाढणारी लोकसंख्या, संगणकीकरण, जागतिकीकरण, यांत्रिकीकरणामुळे शासकीय नोकऱ्यांची संधी अल्प आहे. अशाही परिस्थितीमध्ये सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी खासगी क्षेत्रांकडे वळावे, या हेतूने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्यासाठी आॅनलाईन नोंदणी होती तरी अनेक मुलांनी याकडे दुर्लक्ष केले. तसेच अनेकजण तयारी न करताच या मेळाव्यासाठी आले होते. स्पर्धेच्या युगात जर बेरोजगार युवकांना टिकायचे असेल तर त्यांनी पूर्ण तयारी करूनच मेळाव्यास यावे.
-गं. अ. सांगडे, सहायक संचालक
रोजगार व स्वयंरोजगार

या रिक्त पदांसाठी
झाल्या मुलाखती
कॅशिअर, आॅपरेटर, जॉब वर्क, ट्रेनी कामगार, क्लार्क, फिटर, ट्रेनी, हेल्पर, विमा प्रतिनिधी, सेल्स कन्सल्टंट्स, मशीन आॅपरेटर, विमा सल्लागार, टेलिफोन आॅपरेटर, क्वॉलिटी इन्स्पेक्टर, सी.एन.सी. आॅपरेटर यासह विविध पदांसाठी मुलाखती झाल्या.
शैक्षणिक पात्रता : आठवी पास, दहावी पास-नापास, बारावी,
बी. एस्सी., बी. कॉम., बी. ए., आय.टी.आय., पदवीधर, पदव्युत्तर अशा विविध शैक्षणिक पात्रता होत्या.