‘पॉलिटेक्निक’च्या पदविका अभ्यासक्रमानंतर नोकरी, व्यवसायाच्या विविध संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:17 AM2021-07-20T04:17:46+5:302021-07-20T04:17:46+5:30
कोल्हापूर : शासकीय अथवा खासगी तंत्रनिकेतनमधील (पॉलिटेक्निक) तीन वर्षांचा पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरी, व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध ...
कोल्हापूर : शासकीय अथवा खासगी तंत्रनिकेतनमधील (पॉलिटेक्निक) तीन वर्षांचा पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरी, व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध होतात. पारंपरिक अभ्यासक्रमांच्या तुलनेत या पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण कमी खर्चात होते. त्यासह कौशल्य प्राप्त होते. या शिक्षणानंतर अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या शिक्षणाचा पाया भक्कम होण्यास मदत होते.
इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर कोणतीही प्रवेश परीक्षेशिवाय पॉलिटेक्निकमधील पदविका अभ्यासक्रमाला प्रवेशित होता येते. सिव्हील, मेकॅॅनिकल, ऑटोमोबाईल, संगणशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल, शुगर टेक्नॉलॉजी आदी अभ्यासक्रम कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय, खासगी पॉलिटेक्निकमध्ये उपलब्ध आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या सूचनेनुसार डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असे नवे अभ्यासक्रमही सुरू होणार आहेत. आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक आणि उद्योग, व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञांची मते जाणून घेऊन पदविका अभ्यासक्रम अद्ययावत केले जातात. दहावीचे शिक्षण घेऊन पुढे अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेण्यास सहा वर्षे लागतात. तितकाच कालावधी पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यास लागतो. मात्र, पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना पदविका आणि पदवीही मिळते. पदविकेचे शिक्षण घेताना अभियांत्रिकीचा अधिकत्तर अभ्यासक्रम असतो. त्याचा पदवीचे शिक्षण घेताना उपयोग होतो. राखीव आणि ईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कात सवलत मिळते. त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती, स्वाधार आणि पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना उपलब्ध आहेत. जिल्ह्यात २० पॉलिटेक्निक असून त्यांच्या माध्यमातून शिवाजी उद्यमनगर, शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले पंचतारांकितसह जिल्ह्यातील आणि पुणे येथील औद्योगिक वसाहतींना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होते. कोणताही पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी अथवा स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यास पूरक सुविधा, वातावरण कोल्हापूर, पुणे जिल्ह्यात आहे. कमी खर्च, शिष्यवृत्तीची सुविधा आणि रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होत असल्याने पॉलिटेक्निकचे पदविका अभ्यासक्रमांना प्रवेशित होणे दहावीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणारे आहे.
प्राचार्य काय म्हणतात?
पॉलिटेक्निकमधील तीन वर्षांचा कमी खर्चात होणारा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगार, स्वयंरोजगाराच्या मुबलक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात. या संधींना पूरक वातावरण कोल्हापूरमध्ये असून, त्यामध्ये भविष्यात वाढ होणार आहे. करिअरच्यादृष्टीने पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी चांगला पर्याय आहे. या अभ्यासक्रमाने अभियांत्रिकीचा पाया भक्कम होतो. स्पर्धा परीक्षाही देता येतात.
-डॉ. महादेव नरके, प्राचार्य, डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक, कसबा बावडा
दहावीनंतर डिप्लोमा इंजिनिअरिंग हा सध्याच्या स्पर्धेच्या युगातील वयाच्या १९ व्या वर्षी सरकरी तसेच खासगी नोकरीची शंभर टक्के हमी देणारा रोजगाराभिमुख अभ्यासक्रम आहे. त्यामध्ये प्रात्यक्षिक ज्ञानासह कौशल्य विकसित करण्यावर जास्त भर आहे. पुढे पदवी अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध आहे. कमी कालावधीत हमखास नोकरीची संधी मिळवून देणारा हा अभ्यासक्रम असल्याने त्याला विद्यार्थी, पालकांची पसंती आहे.
-विराट गिरी, प्राचार्य, संजय घोडावत पॉलिटेक्निक, अतिग्रे
चौकट
यंदा यासाठी लवकर नोंदणी
उत्पन्न, राष्ट्रीयत्वचा दाखला, आधारकार्ड मोबाईल अथवा बँकेला जोडणे, आदी प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत विद्यार्थी, पालकांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने तंत्रशिक्षण संचालनालयाने यावर्षी दहावीच्या निकाल लागण्यापूर्वीच प्रवेश प्रक्रिया सुरू केली. मोबाईल क्रमांक आणि उपलब्ध असलेल्या कागदपत्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करता येते. दहावीचा निकाल जाहीर झाल्याने नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
जिल्ह्यातील पॉलिटेक्निक : २०
शासकीय : १
अनुदानित : १
खासगी : १८