सतेज पाटील यांना साथ द्या; शहराचा आणखी विकास करू
By admin | Published: October 28, 2015 12:42 AM2015-10-28T00:42:07+5:302015-10-28T00:42:20+5:30
प्रणिती शिंदे यांचे आवाहन : राजलक्ष्मीनगरात प्रचारसभा
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेसाठी तब्बल १२०० कोटी रुपये आणून शहराबरोबर जिल्ह्याचा विकास केला; पण येथील मतदारांनी विधानसभेला कुणाच्या तरी भूलथापांना बळी पडून चुकीचा निर्णय घेतला. काँग्रेस म्हणजे माजी गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील हेच समजून या निवडणुकीत त्यांना साथ द्या, आणखी विकास करू, असे आवाहन सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी येथे केले. राजलक्ष्मीनगर प्रभागातील काँग्रेस उमेदवार दीपा दिलीप मगदूम यांच्या प्रचारार्थ देवकर पाणंद निकम पार्क येथील सभेत त्या बोलत होत्या.
जनतेला ‘अच्छे दिन’चे गाजर दाखवून व भूलभुलैया करून सत्तेवर पोहोचलेले पंतप्रधान मोदी म्हणजे जादूगार आहेत, अशी टीका शिंदे यांनी केली. यावेळी व्यासपीठावर प्रतिमा सतेज पाटील, उमेदवार दीपा मगदूम, सुरेश कुराडे, संध्या घोटणे, युवराज गवळी, माजी सभापती दिलीप टिपुगडे, प्रा. निवास पाटील, दिग्विजय मगदूम उपस्थित होते.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ‘अच्छे दिना’चे गाजर दाखविले. पण, प्रत्यक्षात आज महाराष्ट्रात शेतकरी दुष्काळाने होरपळत आहे. दुसरीकडे, काँग्रेस सरकारने जनतेच्या हितासाठी सुरू केलेल्या योजना बंद करून जनतेला उपाशी ठेवण्याचे काम हे सरकार करीत आहे. परदेश दौऱ्यांवर जाण्यासाठी मोदी सरकारकडे पैसे आहेत; पण, शेतकरी व सरकारी योजनांचे पैसे त्यांना देता येत नाहीत. विरोधकांचा आवाज बंद करण्याचे भाजपचे काम सुरू आहे.
प्रतिमा पाटील यांनी, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात सतेज पाटील यांनी ६० टक्के विकास केला. मात्र, आज ‘खोबरं तिकडं चांगभलं’ ही प्रवृत्ती वाढत आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवा, असे सांगत विधानसभेत जी चूक झाली ती आता करू नका. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना निवडून आणावे, असे आवाहन केले. यावेळी संतोष कांदेकर, युवराज गवळी यांचे भाषण झाले. सुयोग मगदूम यांनी आभार मानले. ( प्रतिनिधी )+++++
गुटखाबंदी केली म्हणून...
माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी गुटखाबंदी केली म्हणून काहीजण नाराज झाले; पण, पाटील यांनी तरुणाईकडे बघून घेतलेला हा सकारात्मक निर्णय होता; परंतु विरोधकांनी याचा अपप्रचार करून व काहींनी पैसे देऊन त्यांचा विधानसभेत पराभव केला. गेली १७ वर्षे काँग्रेसचे आमदार आहेत. स्वार्थी, पक्षांचे काही देणे-घेणे नाही, अशांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवा, अशी टीका आमदार महादेवराव महाडिक यांचे नाव न घेता प्रतिमा पाटील यांनी केली.