जिल्ह्यात आज १९ हजार उमेदवारांची संयुक्त पूर्व परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:28 AM2021-09-04T04:28:38+5:302021-09-04T04:28:38+5:30
कोल्हापूर : कोरोनामुळे चारवेळा पुढे ढकलण्यात आलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा आज, ...
कोल्हापूर : कोरोनामुळे चारवेळा पुढे ढकलण्यात आलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा आज, शनिवारी होणार आहे. या परीक्षेसाठी कोल्हापूर केंद्रावरून १९ हजार ७७६ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. या परीक्षेची बैठक व्यवस्था शहरातील महाविद्यालये आणि हायस्कूल अशा एकूण ५८ उपकेंद्रांवर करण्यात आली आहे.
‘एमपीएससी’च्यावतीने पीएसआय, विक्रीकर निरीक्षक, मंत्रालयीन सहायक या पदांच्या ८०६ जागांसाठी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येत आहे. शहरातील विविध ५८ उपकेंद्रांवर शनिवारी सकाळी अकरा ते दुपारी बारा या वेळेत होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांनी परीक्षा सुरू होण्याच्या तीन तास आधी केंद्रांवर उपस्थित राहणे गरजेचे आहे. त्यांनी त्यांचे मूळ ओळखपत्र जसे की आधार कार्ड, पॅन क्रमांक, फोटो, प्रवेश प्रमाणपत्र छायांकित (झेरॉक्स) प्रत आपल्या सोबत ठेवावी. उमेदवारांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरावा. सॅनिटायझर जवळ ठेवावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी केले आहे. दरम्यान, परीक्षा होणार असल्याने उमेदवारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यांनी शुक्रवारी उजळणीवर भर दिला.